ताज्याघडामोडी

काही बड्या वृत्तपत्रांकडून अनेक पत्रकार,डीटीपी ऑपरेटर आदी कर्मचाऱ्यांना काढून टाकत अन्याय !

काही बड्या वृत्तपत्रांकडून अनेक पत्रकार,डीटीपी ऑपरेटर आदी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत अन्याय !

न्याय मिळवून देण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोना आर्थिक संकटात सापडल्याचे कारण पुढे करत राज्यातील अनेक कार्पोरेट व बड्या वृत्तपत्र मालकांनी आपल्या वृत्तपत्रांमध्ये काम करणारे उपसंपाद्क,पत्रकार,डीटीपी ऑपरेटर,छायाचित्रकार यांना काढून टाकण्याचा सपाटा लावला असून अगदी दहा -वीस वर्षांपासून एखाद्या वृत्तपत्राची इमाने इतबारे नोकरी करणाऱ्यावर त्यामुळे मोठा अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.एकीकडे आपल्या उद्योगातील कामगारांना कामावरून कमी करू नका असे आवाहन करीत असताना अनेक छोट्या व बड्या वृत्तपत्राचे मालक आर्थिक कारण पुढे करीत कामावरून कमी करत आहेत.आपल्या विविध उद्योग,कारखाने,व्यवसाय भरभराटीस आणल्यानंतर वृत्तपत्र व्यवसायात भांडवल गुंतवून अनेक आवृत्या प्रकाशित करणारे काही उद्योगपतीही आपल्या वृत्तपत्रातील कामगारांना कामावरून कमी करून अन्याय करीत आहेत मात्र या बाबत अद्याप एकाही नेत्याने आवाज उठवला नाही. मात्र अकलूजचे माजी सरपंच धैर्यशील मोहिते-पाटील यांनी या कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून न्याय मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
  धैर्यशील मोहिते-पाटील यांनी लिहलेले पत्र 
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,
महाराष्ट्र राज्य
कोरोना महामारीच्या काळात राज्यातील सामाजिक संस्था, नागरीक सर्वच राजकीय संघटना आपल्या परीने मदत करीत आहेत. कोरोना संकटात अनेक उद्योगधंदे व्यापार यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे. याचा परीणाम लोकांच्या नोकरीवर झाला आहे. अनेक उद्योगधंदे कंपन्यांनी मनुष्यबळ कमी करण्यास सुरूवात केली आहे.
यांचा फटका राज्यातील वृत्तपत्र व्यवसाय मोठ्या प्रमाणावर बसला आहे. हा व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात आला असुन पत्रकारांना पगार देण्यासाठी पैसे नसल्याचे कारण देत राज्यातील विविध वृत्तपत्र समुहातील कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले/येत आहे.
यामध्ये वार्ताहर, उपसंपादक, छायाचित्रकार, मुद्रितशोधक, डीटीपी ऑपरेटर अशी कामं करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अचानक नोकरी गेलेल्या या कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या काळात नवीन नोकरी मिळणे अवघड आहे. पत्रकारांनी कोरोना काळात कुठे नोकरी मिळवायची असा मोठा प्रश्न आहे. अनेक लोकांनी एकाच वर्तमानपत्र समुहात दहा पंधरा वर्षे कार्यकाळ घालवला आहे.
मुख्यमंत्री या नात्याने आपण या विषयी लक्ष घालावे. आपले सुद्धा सामाना सारखे माध्यम समुह आहे. आपण पत्रकारांच्या व या क्षेत्राशी संबंधीत असणा-या कर्मचारी यांच्या समस्या जाणून घ्यावी व तात्काळ या कर्मचारी वर्गाला न्याय मिळवून द्यावा.
आपला
धैर्यशील मोहिते पाटील

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *