ताज्याघडामोडी

घरकुलासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण, वृद्धाचा थंडीनं मृत्यू

शासन आणि प्रशासनाची असंवेदनशीलता समोर आणणारी घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. हक्काचे घरकुल बांधून मिळावे तसेच उरलेले हप्ते मिळावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसलेल्या वृद्ध व्यक्तीचा थंडीनं गारठून मृत्यू झाला आहे. आप्पाराव भुजाराव पवार असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला आमचा प्रश्न समजून घ्यायला वेळ मिळाला नाही, असा आरोप पवार यांच्या नातेवाईकांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच थंडीने गारठल्यानं या उपोषण करणाऱ्या आप्पाराव पवार यांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला स्वतः असणाऱ्यांची चौकशी होणार का असा सवाल आता विचारला जात आहे.

आप्पाराव भुजाराव पवार हे वासनवाडी येथील रहिवासी आहेत. ते कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. शासनाने मंजूर केलेले घरकुल तातडीने बांधून देण्यात यावे. यासह इतर मागण्यांसाठी पवार हे कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषण करत होते. मात्र, या उपोषनकर्त्या व्यक्तीची साधी दखलही प्रशासन किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आली नव्हती. पवार यांचा सकाळी मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

आप्पाराव पवार यांच्या मृत्यूला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. वारंवार निवेदन आणि अर्ज देऊन देखील त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळेच त्यांच्यावर उपोषणाची वेळ आली आणि अखेर थंडीने गारठल्यानं त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *