ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कडक लॉकडाऊन परतला; ६१ गावे पुढचे १० दिवस बंद

राज्यातील अनेक जिल्ह्यांत करोनाचा संसर्ग घटत असताना नगर जिल्ह्यात मात्र चिंता कायम आहे. नगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १० पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या ६१ गावांत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या गावांमध्ये ४ ते १३ ऑक्टोबरपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. त्यामुळे तेथील शाळा आणि मंदिरेही खुली होणार नाहीत.

नगरच्या करोना बाधितांची संख्या पुण्यातील रुग्णालयांत वाढत असल्याची गंभीर दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेऊन नगरमध्ये तातडीने उपाययोजना करण्याचा आदेश नुकताच दिला आहे. यामध्ये सर्वाधिक २४ गावे संगमनेर तालुक्यातील आहेत. श्रीगोंदा नऊ, राहाता सात, पारनेर सहा, शेवगाव चार, अकोले व श्रीरामपूर प्रत्येकी तीन, कर्जत दोन तर कोपरगाव व पाथर्डी प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रमुख देवस्थाने असलेल्या शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहाटा देवी, मढी, राशीन, बुऱ्हाणनगर, केडगाव या गावांचा यात समावेश नाही, ही समाधानाची बाब आहे.

कडक लॉकडाऊन करण्यात आलेल्या गावातील फक्त किराणा दुकाने सकाळी ८ ते ११ या वेळेत सुरू राहतील. गावातील लोकांना बाहेरगावी जाण्यास आणि बाहेरच्या लोकांना या गावात येण्यास बंदी राहील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. विवाह आणि इतर कार्यक्रमांना बंदी आहे. तर अंत्यविधी आणि दशक्रिया विधी २० लोकांच्या उपस्थितीत करता येईल. गावातील अंतर्गत आणि पर्यायी रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. मुख्य रस्त्यावरील गावांत फक्त पुढे जाणाऱ्या वाहनांनाच परवानगी देण्यात येणार आहे. बाहेरगावच्या लोकांना अशा गावात थांबता येणार नाही.यासोबत कंटेन्मेंट झोनचे सर्व निर्बंध लागू राहणार आहेत.

जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्या ५०० ते ८०० च्या दरम्यान आहे. अनेकदा आढावा बैठका घेतल्या, उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या मात्र फरक पडला नाही. नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी अलीकडेच नगरला भेट देऊन २० पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या गावांत करोना समित्यांमार्फत उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, तरीही फरक पडला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *