ताज्याघडामोडी

मंत्रिपद गेले खड्ड्यात मग….. गुलाबराव पाटलांचा रोखठोक इशारा

माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना मी सोडणार नाही, त्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवरायांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा आणि शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांच्या एकापाठोपाठ एक छत्रपती शिवरायांवरील वादग्रस्त व्यक्तव्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट असताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही या स्पर्धेत भाग घेतला. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी या महोत्सवाची माहिती देताना त्यांनी शिवरायांच्या जन्मस्थळाविषयी चुकीचं विधान केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असं विधान करुन त्यांनी अकलेचे तारे तोडले. आमदार लाड यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतलेला असताना आता शिंदे गटानेही रोखठोक इशारा दिलाय.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवरायांबद्दल कोणीही चुकीचे बोलत असेल, तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला माफ केलं जाणार नाही. छत्रपती शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करू शकत नाही, मंत्रीपद गेलं खड्ड्यात यांना सोडणार नाही, शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *