ताज्याघडामोडी

आवाज देऊनही चालकानं गाडी थांबवली नाही, घाबरलेल्या 3 मुलींनी धावत्या जीपमधून मारली उडी

मागच्या काही दिवसांत सोशल माध्यमांमधून मुलं पळवणारी टोळी, अपहरण करणाऱ्या टोळ्यांबाबत अफवा पसरलेल्या होत्या. याच अफवांच्या भीतीतून काही घटना आता घडताना दिसत आहेत.

परभणीच्या बोरीमध्ये पीकअप चालकानं गावाच्या वेशीवर पीक अप न थांबवल्यानं तीन मुलींनी धावत्या जीपमधून उडी मारल्याची घटना घडली आहे. यात तिनही मुली जखमी झाल्या आहेत. त्यापैकी 2 जणींना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एका जखमी मुलीवर परभणीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील रीडज येथील दहा मुली शाळेसाठी बोरीकडे येत असताना पाठीमागून येणाऱ्या प्रवासी पीकअपमध्ये बसल्या. या मुलींना चांदज पाटीवर उतरायचं होतं. परंतु पीकअप चालकानं गाडी न थांबवता जिंतूरकडे गाडी वळवल्यानं घाबरून मनीषा खापरे, दीपाली मुटकुळे, मेघना शेवाळे या 3 मुलींनी धावत्या पिकअपमधून उडी मारली. धावत्या पीकअपमधून तिघींनीही उडी घेतल्यामुळं त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. 

दीपाली आणि मनीषा या दोघींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यातील दीपाली मुटकुळे आणि मेघना शेवाळे या दोघींवर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मनीषावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान घटना घडल्यानंतर सदर पीकअप चालकानंच या मुलींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तसेच पोलीस ठाण्यात जाऊनही माहिती दिली.

दरम्यान पोलिसांनी सदर पीकअप ताब्यात घेतलं आहे. तसेच, चालक किसन पाणपट्टे यांच्या विरोधात वाहन चालवताना निष्काळजी केल्याप्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बोरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार मुळे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *