ताज्याघडामोडी

राज्यात २० हजार पदांसाठी पोलीस भरती होणार; बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या बैठकीनंतर महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून आम्ही पोलीस भरतीबाबत निर्णय घेतला आहे. राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार आहेत. ८ हजार पदांबाबत जाहिरात निघाली असून आणखी १२ हजार पदांची जाहिरात लवकरच काढण्यात येईल,’ अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

राज्यातील हजारो तरूण गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत होते. काही दिवसांपूर्वी स्वत: देवेंद्र फडणवीस यांना तरुणांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. सरकारने तत्काळ रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी करत नांदेड येथे तरुणांनी फडणवीस यांना घेराव घातला होता. आता अखेर सरकारने या भरती प्रक्रियेबाबत मोठी घोषणा केली आहे.

दुसरीकडे, राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या विविध घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गृहखात्याची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा झाल्यानंतर फडणवीस यांनी पोलीस दलाला सूचना दिल्या आहेत. ‘तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे सिद्ध होण्याचा दर वाढला पाहिजे, असा आमचा प्रयत्न असणार आहे. तुरुंग विभागात काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

आपल्या तुरुंगांमध्ये असे अनेक कैदी आहेत ज्यांचा जामीन मंजूर झाला आहे, मात्र पैसे किंवा कोणी व्यक्ती नसल्यामुळे ते तुरुंगाबाहेर येऊ शकले नाहीत. अशा कैद्यांना तुरुंगाबाहेर जाता यावं, यासाठी आम्ही एनजीओंचीही मदत घेणार आहोत. सायबर सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. सायबर गुन्हे लवकरात लवकर उघडकीस येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *