ताज्याघडामोडी

मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची मागितली माफी

पाळण्यातील बाळापासून ते ९० वर्षांच्या म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाची माफी मागतो – ना.तानाजी सावंत 

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अखेर मराठा समाजाची माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी मराठा समाजातील पाळण्यातील बाळापासून ते ९० वर्षांच्या म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाची माफी मागत आहे, असे तानाजी सावंत यांनी म्हटले. ज्या समाजात माझा जन्म झाला, ज्या समाजाने मला मानपान दिला, त्यांची एकदा काय एक लाख वेळा माफी मागेन, त्यांना माझं बोलणं खटकलं असेल तर मला त्यांची माफी मागण्यात काहीही कमीपणा वाटत नाही, असेही तानाजी सावंत यांनी म्हटले. 

यावेळी तानाजी सावंत यांनी त्यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादासंदर्भात स्पष्टीकरण केले. देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण मिळवून दिले. त्यानंतर एक-दोन बॅचेसमधील मराठा तरुणांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षणही मिळाले. पण २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालायने मराठा आरक्षण रद्द केले. आरक्षण रद्द झाल्यानंतर ते आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येईपर्यंत एकही मराठा नेता मराठा आरक्षणाबाबत काहीच बोलला नाही. मराठा समाजाला ओबीसीतून किंवा अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळाले पाहिजे, असे सांगून काहीजण मराठा आणि इतर समाजांमध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याविषयी मला बोलायचे होते. पण माझे बोलणे अर्धवट दाखवून त्याचा विपर्यास करण्यात आला. माझे म्हणणे इतकेच होते की, नव्या सरकारला आणि मंत्र्यांना कायदेशीर कसोटीवर टिकणारे मराठा आरक्षण मिळवण्यासाठी थोडी फुरसत द्या. त्यासाठी आम्हाला २०२४ पर्यंतची मुदत द्या. तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मराठा आंदोलनात सहभागी होईन, असे तानाजी सावंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *