ताज्याघडामोडी

अजितदादांच्या सभेत शेतकरी उठला; दादांच्या समक्ष म्हणाला.. प्रांतांनी आम्हाला 5 लाख मागितले!

काटेवाडीचे सोसायटीचे कार्यालय! एक तास राष्ट्रवादीचा या उपक्रमांतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते आणि अचानक अजित देवकाते नावाचे शेतकरी उठले आणि त्यांनी सांगितले, ‘दादा, हा प्रांत आम्हाला पैसे मागतो, भूसंपादनाच्या कामात पोटहिस्से करून दिले नाहीत, मुद्दाम अडथळे आणले.

आम्हाला पाच लाख रुपये मागितले, अशा स्वरूपाचा गंभीर आरोप करताच सारी सभा स्तब्ध झाली. दरम्यान प्रांताधिकारी यांनी मात्र अद्याप कुठलीच प्रक्रिया झाली नाही असे सांगत हे आरोप चुकीचे असल्याचा खुलासा केला.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान काटेवाडी येथे एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमांतर्गत अजित पवार यांची सभा झाली. ही सभा सुरू असतानाच ते त्यांच्याकडे ज्यांनी निवेदने दिली आहेत, त्यांची नावे वाचून जागेवरच त्यांची कामे मार्गी लावत होते.

याच दरम्यान या सभेमध्ये श्रोत्यांमध्ये बसलेले अजित देवकाते उठले आणि त्यांनी थेट प्रांत अधिकाऱ्यांचे नाव घेऊन प्रांत अधिकाऱ्यांवर आरोप केला. दादा, प्रांत आम्हाला पैसे मागतो, भूसंपादनाच्या कामात पाच लाख रुपये मागितले अशा स्वरूपाचा गंभीर आरोप त्यांनी केला. यावेळी प्रांताधिकारी पुढे सरसावले आणि त्यांनी अजित पवार यांना स्पष्टीकरण दिले.

त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजित देवकाते यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला व माझे आणि अजित तुझे नाव एकसारखे आहे, तरी मी एवढा शांत आणि संयमीपणे मी बोलतो आहे, तू देखील शांतपणे बोल, तुझे जे काम आहे, ती मी मार्गी लावतो, तुला त्रास झाल्यामुळे तू बोलतो आहे मी तुझे काम मार्गी लावतो अशा स्वरूपात अजितदादांनी अजित देवकाते यांची समजूत घातली.

दुसरीकडे प्रांताधिकारी यांनी मात्र लगेचच अजित पवार यांच्यासमोर जाऊन हा आरोप खोडून काढला आणि संबंधित क्षेत्रातील वाटपच अद्याप झालेले नाही, त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची रक्कम दिली गेली नसल्याचा तसेच भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप झाली नसल्याचा खुलासा केला. तसेच हे आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *