ताज्याघडामोडी

इलेकट्रीक बाईकच्या बॅटरीचा चार्जिंग करताना स्फोट, पतीचा मृत्यू, पत्नी आणि दोन मुलांची प्रकृती चिंताजनक

पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून इलेकट्रीक वाहनांना लागणाऱ्या आगीमुळे या वाहनांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आंध्र प्रदेशातील विजयवाडा शहरात शनिवारी पहाटे इलेक्ट्रिक बाइकच्या बॅटरीचा स्फोट होऊन एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ माजली आहे. इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाल्यानंतर त्या घरातील बेडरूमला आग लागली. या आगीमध्ये त्या व्यक्तीची पत्नीही मोठ्या प्रमाणात भाजली. या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर या स्फोटात त्यांची दोन मुले जखमी झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी तेलंगणामधील निजामाबाद शहरात अशीच एक घटना समोर आली होती. जिथे इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीचा स्फोट होऊन एका 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. विजयवाडा येथील डीटीपी कर्मचारी के. शिवकुमार यांनी शुक्रवारीच नवीन इलेक्ट्रिक बाईक खरेदी केली होती. त्यांनी गाडीची बॅटरी रात्री बेडरूममध्ये चार्जिंगला लावून ठेवली होती. शनिवारी पहाटे घरातील सर्वजण झोपलेले असताना बॅटरीचा अचानक स्फोट झाला.

या बॅटरीचा स्फोट झाल्यानंतर बेडरुमला आग लागली. या आगीत घरातील एसी आणि काही वस्तू जळून खाक झाल्या. घरातून धूर येत असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. कुटुंबातील सदस्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असताना वाटेतच शिवकुमार यांचा मृत्यू झाला.

आगीत भाजलेल्या शिवकुमार यांच्या पत्नीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांना 48 तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या आगीत शिवकुमार यांची दोन्ही मुलेही भाजली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बॅटरीचा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा तपस करण्यासाठी ईव्ही कंपनी सोबत पोलिसांचे बोलणे झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनीही स्फोटाचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना देखील स्फोटाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *