ताज्याघडामोडी

खरेदी केल्यावर सहा दिवसातच बंद पडली इलेक्ट्रीक स्कुटर ! ग्राहकाने काढली गाढवाला बांधून गावभर धिंड !

इलेक्ट्रीक वाहने खरेदी करण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. पंरतू या इलेक्ट्रीक वाहनांमधील अनेक त्रुटीदेखील समोर येत आहेत.

काही इलेक्ट्रीक दुचाकींना अचानक आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. तर खरेदी केल्यानंतर काही महिन्यातच बंद पडल्याने एकाने आपली चारचाकी इलेक्ट्रीक गाडी बॉम्बने उडवून दिल्याचा एक व्हिडओदेखील समोर आला होता.

बीड जिल्ह्यातील परळी येथील इलेक्ट्रीक दुचाकी घेऊन वैतागलेल्या एका ग्राहकाने चक्क या दुचाकीची गाढवाला बांधून शहरात सगळीकडे धिंड काढली आहे. सचीन गित्ते असे या ग्राहकाचे नाव आहे. त्यांनी १६ सप्टेंबर २०२१ रोजी २० हजार रुपये भरून ओला कंपनीची इलेक्ट्रीक दुचाकी बुक केली.

२१ जानेवारी रोजी त्यांनी उर्वरीत ६५ हजार रुपयेही भरले. त्यांना २४ मार्च रोजी गाडी ताब्यात मिळाली. मात्र ही गाडी सहाच दिवसात बंद पडली. त्यानंतर त्यांनी कंपनीशी संपर्क साधला. कंपनीचा मॅकेनिक येऊनही गेला, पण दुचाकी काही दुरुस्त झाली नाही.

त्यानंतर कंपनीकडून सतत उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. या कंपनीचे तालुका किंवा जिल्हास्तरावर शोरुमही नसल्याने गित्ते यांना एका कष्टमर केअर नंबरशिवाय संपर्कासाठी दुसरे साधनही नव्हते. यामुळे वैतागलेल्या गित्ते यांनी अखेर २४ एप्रिल रोजी ही दुचाकी गाढवाला बांधली आणि परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील रस्त्यावरून फिरवली. सचीन गित्ते यांच्या या निषेधाची परळी शहरात चांगलीच चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *