ताज्याघडामोडी

ठाकरे गटाला मोठा दिलासा, पक्षाची संपत्ती शिंदे गटाला देण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकारला पाय उतार व्हावे लागले होते. यामुळे शिसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले. उद्धव ठाकरे यांना पक्ष आणि चिन्ह गमवावे लागले होते.

त्यानंतर ठाकरे गटाकडे असलेली पक्षाची संपत्ती ही शिंदे गटाला देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला देखील खडेबोल सुनावले आहेत.

वकील आशिष गिरी यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी आशिष गिरी यांना फटकारले. संपत्ती शिंदे गटाला द्यावी अशी मागणी करणारे तुम्ही कोण?, असा सवाल करत सुप्रीम कोर्टाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यामुळे ठाकरे गटाकडेच ही संपत्ती राहणार आहे.

आशिष गिरी यांनी 10 एप्रिल 2023 ला सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. आशिष गिरी यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये ठाकरे गटाकडे असलेली पक्षाची संपत्ती ही शिंदे गटाला देण्यात यावी अशी मागणी केली होती. या याचिकेत त्यांनी असे म्हटले होते की, ‘एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यनेते झाले आहेत. त्यामुळे शिवसेना भवनासह पक्षाचा निधी, शिवसेनेच्या शाखांचा ताबा शिंदे गटाला देण्यात यावा. तसंच, निकाल लागेपर्यंत ठाकरे गटाला पक्षाचा निधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा.’

आज सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आशिष गिरी यांना चांगलेच फटकारले. ‘ही याचिका दाखल करणारे तुम्ही कोण?’, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी ही याचिका फेटाळून लावली. महत्वाचे म्हणजे, शिंदे गटाने आधीच शिवसेना भवनावर दावा करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तरी देखील आशिष गिरी यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेशी शिंदे गटाचा काहीही संबंध नाही. आता ही याचिका फेटाळल्यामुळे ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *