आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय जनता पक्षाचा एका बडा नेता आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपी भाजप नेत्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. पीडित महिलेनं लावलेल्या आरोपात तथ्य असल्याची प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
संबंधित घटना झारखंड राज्यातील पश्चिमी सिंहभूम येथील आहे. तर संजय मिश्रा असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून ते भारतीय जनता पार्टीच्या पश्चिमी सिंहभूम मीडिया प्रभारी आहेत. याबाबत माहिती देताना चक्रधरपूरचे डीएसपी दिलीप खलको यांनी मंगळवारी सांगितलं, आरोपी आणि पीडित महिलेची वेगवेगळी चौकशी केल्यानंतर, आरोपी संजय मिश्राला अटक करण्यात आली आहे. डीएसपी दिलीप खलको यांनी सांगितलं की, पीडित तरुणीने लावलेल्या आरोपात तथ्य असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
तसेच पीडित आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याचा आरोपात देखील तथ्य आढळलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय मिश्रा एप्रिल महिन्यापासून पीडित तरुणीला ब्लॅकमेल करत होता. आरोपी संजय मिश्रा याने पीडित महिला खेळाडूचा एक फोटो काढला होता. संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी पीडितेला एका स्थानिक हॉटेलमध्ये बोलावून तिचं लैंगिक शोषण करत होता.
दुसरीकडे, अटक होण्यापूर्वी संजय मिश्रा यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, माझे विरोधक मला निवडणुकीत कसल्याही परिस्थितीत पराभूत करू इच्छित आहेत. त्यामुळे त्यांनी एकजुटीने माझ्याविरोधात वातावरण निर्माण केलं आहे. माझ्यावर बलात्काराचा आरोप होणं हे विरोधकांनी रचलेलं घृणास्पद षडयंत्र आहे. माझा प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. पोलिसांनी दोघांचे कॉल डिटेल्स तपासावे. तसेच आरोपात ज्या हॉटेलचा उल्लेख करण्यात आला त्या हॉटेलातील 3 एप्रिलचे रजिस्टर तपासावे, तसेच सीसीटीव्ही पाहावेत. असंही त्यांनी म्हटलं आहे.