ताज्याघडामोडी

मला कोल्हापूरातील रुग्णालयातच ठार मारण्याचा कट आखला होता : नितेश राणे

संतोष परब हल्लाप्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असताना मला ठार मारण्याचा कट आखण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणे यांना अटक झाली होती.

त्यावेळी सावंतवाडी कारागृहात असताना नितेश राणे यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर सुरुवातीला कणकवली जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्यांच्या छातीचे दुखणे कायम असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले होते. त्यावेळी मला रुग्णालयातच मारण्याची योजना आखली होती, असा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत केला.

छातीत दुखत असल्याने कोल्हापूरच्या रुग्णालयात नितेश राणे यांची अँजिओग्राफी करावी, असा डॉक्टरांचा आग्रह होता. पण मला तशी गरज वाटत नसल्याचे मी डॉक्टरांना सांगितले. माझा रक्तदाब आणि शुगर लेव्हल कमी असली तरी मला सर्व गोष्टी कळत होत्या. सीटी अँजिओ चाचणी करण्यासाठी रुग्णाच्या शरीरात इंक टाकावी लागते.

यादरम्यान रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने मला येऊन सांगितले की, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सीटी-अँजिओ करून घेऊ नका. तुमच्या शरीरात इंक टाकून तुम्हाला मारण्याचा प्लॅन आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या टेस्टला होकार देऊ नका, असे त्या कर्मचाऱ्याने मला सांगितल्याचा दावा नितेश राणे यांनी केला.

एखाद्या व्यक्तीला चुकीचं इंजेक्शन, चुकीचं औषध देऊन देऊन कायमस्वरूपी संपवून टाकायचे, याला ठाकरे सरकार म्हणतात. या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे. ठाकरे सरकारला विरोधी नेत्यांना सभागृहातच येऊन द्यायचे नाही. त्यांना जिवंतही ठेवायचे नाही, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *