ताज्याघडामोडी

लक्षवेधी लावत नसल्यामुळे विधानसभेत आमदार सुनील शेळके रडले!

आपण कायम लोकप्रतिनिधी भावूक झाल्याची काही उदाहरणे पाहत असतो. काही नेतेमंडळी अनेकदा जाहीर मंचावरुन रडल्याचे देखील आपण पाहिले आहे.

पण आता एका आमदाराला विधिमंडळात अक्षरक्ष: रडायची वेळ आली आहे. ही वेळ राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यावर आली आहे. कालपासून आपली लक्षवेधी लावत नसल्यामुळे सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले. शेळके यांनी पवना धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील विषयावर लक्षवेधी लावली होती. पण ती लागत नसल्यामुळे ते नाराज झाले.

आमदार सुनील शेळके म्हणाले की, पवना धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचा जर यांनी विषय घेतला नाही. तर 2011 साली जे प्रकरण झाले होते. त्याची पुनरावृत्ती पुन्हा होईल. कारण त्यावेळी जे आंदोलन झाले होते, ते याच विषयासाठी झाले होते. त्यांनी सांगितलं की, अजित पवार यांची भेट घेतली, त्यांनी मीटिंग लावण्याचे आश्वासनं दिले आहे. विधानसभेत देखील मला मीटिंग लावण्याचे आश्वासन मिळाले आहे. हा विषय त्यांना मार्गी लावावाच लागेल, अन्यथा लढा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेळके यांनी दिला.

आमदार सुनील शेळके म्हणाले की, सरकारचा आमदारांना घरे देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. कारण अनेक आमदार असे आहेत, जे लोकवर्गणीतून आमदार आहेत. त्यांची परिस्थीत हालाखीची आहे. त्यांना घर मिळणे गरजेचे आहे. आमच्या सारख्या शहराच्या जवळ राहणाऱ्या सधन आमदारांनी मनाचा मोठपणा दाखवावा, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *