ताज्याघडामोडी

आरोपीचा मृतदेह कोपर्डीत आणण्यास गावकऱ्यांचा विरोध; पुण्यात केले अंत्यसंस्कार

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यातील पप्पू शिंदे या आरोपीने पुण्यातील येरवडा कारागृहात रविवारी आत्महत्या केली होती. तर नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेवर पुण्यातील कैलास स्मशानभूमीत मध्यरात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी येथे 13 जुलै 2016 च्या संध्याकाळी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आंदोलन पेटले होते. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी मराठा समाजाने राज्यभर आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला होता. तर दोषी तिघांना फाशी दिली तरच आमच्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबाने केली होती. अखेर त्या तीनही आरोपींना अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

कोपर्डी येथील सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात आत्महत्या केली. तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आरोपी जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष मवाळ या तिघांनी 13 जुलै 2016 रोजी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे शालेय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणी नोव्हेंबर 2017 मध्ये तिन्ही आरोपींना दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *