ताज्याघडामोडी

पंढरपूर साठी विशेष एसटी बसेस सोडू नये

पंढरपूरच्या वारीची लाखो वारकरी प्रतीक्षा करत असतात. पंढरपूरचे अर्थचक्र वारीवर अवलंबून असते. वारीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते असे असले तरी वारीच्या धर्तीवर एकही एसटी गाडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ करू नये, असे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने संपूर्ण राज्यातील विभागांना दिले आहेत.

मंगळवार, २० जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी असून चार्तुमासारंभ देखील होत आहे. वारीनिमित्त चंद्रभागेच्या तिरी दरवर्षी भक्तिसागर उसळतो. करोना तिसरी लाट लक्षात घेता वारीसाठी येणाऱ्या पालख्या, दिंड्यांना पंढरपूरमध्ये येण्यास सरकारने बंदी घातली आहे. वारकरी, भाविक चोरट्या मार्गाने प्रवेश करण्याची शक्यता आहे, असे नमूद करत आदेश काढण्यात आले.

१७ जुलै दुपारी २ ते २५ जुलै सायंकाळी ४ पर्यंत सर्व जिल्ह्यातील एसटी सेवा पंढरपूर येथे येण्यास मनाई करण्यात आली आहे. आंतरराज्य -आंतरजिल्हा नाकाबंदी, पंढरपूर तालुका सीमा नाकाबंदी व शहरात नाकाबंदी आहे. या काळात राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांनी एकही एसटी पंढरपूरसाठी रवाना करू नये. तसेच पंढरपूर येथून आरक्षणासाठी उपलब्ध केलेल्या सर्व फेऱ्या तातडीने बंद कराव्या, असे आदेश सोलापूरच्या विभाग नियंत्रकाने दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *