गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वृद्धाने पेटवून दिलं घर; आगीत जळून मुलगा, सून अन् 2 नातवंडांचा मृत्यू

केरळमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरातील मालमत्तेच्या वादातून एका वृद्धाने इडुक्की भागात आपला मुलगा आणि कुटुंबातील इतर तीन सदस्यांना पेटवून दिलं. माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, ही घटना शनिवारी सकाळी घडली. या घटनेनंतर 79 वर्षीय आरोपी हमीदला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेला सांगितलं की, या घटनेत घरात झोपलेला मुलगा, सून आणि दोन नातवंडांचा जळून मृत्यू झाला आहे. 79 वर्षीय हमीदने घराला कुलूप लावून पेट्रोलने भरलेल्या छोट्या बाटल्या बाहेरून खिडकीतून आत फेकल्या. त्यानंतर त्यांनी घराला आग लावली.

यादरम्यान आग लागल्याचं पाहून कुटुंबातील एका सदस्याने लोकांना मदतीसाठी हाक मारली, मात्र आग मोठी असल्याने शेजाऱ्यांनाही या लोकांना वाचवता आलं नाही. काही वेळातच आगीने घर पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतलं. पोलिसांनी सांगितलं की, शेजाऱ्याने हमीदला घरात पेट्रोलची बाटली फेकताना पाहिलं होतं.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, हमीदने गुन्हा करण्यासाठी किमान 5 पेट्रोलच्या बाटल्या साठवून ठेवल्या होत्या आणि आग विझवण्याचा संभाव्य प्रयत्न टाळण्यासाठी घरातील पाण्याची टाकीही रिकामी केली होती. त्यामुळे ही नियोजित हत्या होती. त्यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला सांगितलं की आरोपी हमीदने शेजाऱ्यांनी मदतीसाठी विहिरीतून पाणी आणू नये म्हणून बादली आणि दोरीही काढली होती.

पोलिसांनी सांगितलं की, ‘घरातील दृश्य हृदय पिळवटून टाकणारं होतं. वडील आणि सर्वात लहान मुलीने एकमेकांना घट्ट मिठी मारलेली होती, त्यांचे मृतदेहही याच अवस्थेत आढळले. पुढील तपासासाठी मृतदेह वेगळे करणं आमच्यासाठी खूप अवघड होतं.’ चौकशीत हमीदने आपल्या मुलासोबत झालेल्या कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *