ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश

 केंद्रीय मंत्रीमंडळाचा आज (बुधवार ७ जुलै २०२१) विस्तार होणार आहे. एएनआयच्या वृत्तानुसार ४३ नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज होणार आहे. शपथविधी आज संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवन येथे होईल. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपचे खासदार नारायण राणे यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. नारायण राणे यांच्यासह भागवत कराड, कपिल पाटील या महाराष्ट्रातील भाजप खासदारांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होणार आहे.

नारायण राणे – नारायण राणे (६९) यांचा प्रवास शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस असा झाला आहे. प्रशासनावर उत्तम पकड, प्रचंड आत्मविश्वास ही त्यांची दोन प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू अशी एकेकाळी राणेंची ओळख होती. कोकणात शिवसेना पसरण्यासाठी ज्या नेत्यांनी मोठे योगदान दिले त्यात राणे यांचा समावेश होतो.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्याचे माजी महसूलमंत्री, राज्याचे विरोधी पक्षनेते अशी पदे हाताळण्याच्या निमित्ताने राज्याच्या कारभाराची माहिती त्यांना झाली. पुढे राजकीय मतभेदानंतर राणेंनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला. काँग्रेसमध्ये असताना ते पुन्हा एकदा राज्याचे महसूल खाते सांभाळत होते. काही काळ त्यांनी राज्याचे उद्योग मंत्रालयही सांभाळले होते. पण मोदी लाटेचा परिणाम देशात आणि महाराष्ट्रात दिसू लागल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या तिकिटावर खासदार झालेले राणे पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रीमंडळाचे सदस्य झाले आहेत. याआधी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना मराठा आरक्षणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली होती. यामुळे केंद्रीयमंत्री म्हणून राणे काय कामगिरी करतात याकडे अनेकांचे लक्ष असेल.

कपिल पाटील – कपिल पाटील भाजपचे महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी मतदारसंघाचे खासदार आहेत. ते सलग दुसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर भिवंडीतून खासदार झाले आहेत. याआधी मार्च २०१४पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद सांभाळले आहे. तसेच त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे.

भागवत कराड – भागवत कराड हे भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. डॉक्टर असलेले कराड आधी औरंगाबादचे महापौर होते. भाजपमध्ये दीर्घकाल त्यांनी संघटनात्मक जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत.

भारती पवार – डॉ.भारती पवार या भाजपच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्यांना डिसेंबर २०१९ मध्ये सर्वोत्तम महिला संसदपटू हा पुरस्कार मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *