गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भूमिअभिलेख कार्यालयातील लाचखोर महिला लिपिकाला सक्तमजुरी

मोजणी केलेल्या गटाच्या नकाशात हिश्श्यांची निशाणी करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडलेल्या भूमिअभिलेख कार्यालयातील महिला लिपिकाला चार वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

जुलै 2017 मध्ये नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली होती. ज्योती दत्तात्रय डफळ उर्फ ज्योती संदिप नराल असे या महिला लिपिकाचे नाव आहे.

तक्रारदाराची नगर तालुक्यात साडेतीन हेक्टर जमीन आहे. या जमिनीची आपसात पाच हिश्श्यांत वाटणी झाली आहे. या जमिनीची गटफोड झाली नसल्याने तक्रारदाराने भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज देऊन शुल्क भरून मोजणी करून घेतली. मोजणीचा नकाशा प्राप्त केला.

मात्र, या नकाशात मोजणीप्रमाणे पाच हिश्श्यांची निशाणी (खुणा) नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर तक्रारदाराने मोजणी करणाऱया लिपिक डफळ यांना हिश्श्यांची निशाणी नकाशावर करून देण्याची विनंती केली; परंतु नकाशावर निशाणी करून देण्यासाठी पाच हिश्श्यांचे प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे दहा हजार रुपयांची मागणी त्यांनी केली.

तक्रारदारांनी या लिपिकाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार विभागाच्या पथकाने सापळा रचून डफळ यांना अटक केली होती.

पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम पवरे यांनी या गुह्याचा तपास केला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. तेथे सरकारतर्फे सहायक सरकारी वकील अर्जुन पवार यांनी बाजू मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *