ताज्याघडामोडी

काँग्रेसच्या वर्किंग कमिटीतून बाळासाहेब थोरातांना वगळलं; ‘या’ कारणामुळे पक्षाकडून पत्ता कट?

काँग्रेसच्या नव्या वर्किंग कमिटीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून या कमिटीमध्ये महाराष्ट्रातील आठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र पूर्वीच्या समितीत असलेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना आता वगळण्यात आलं आहे. तसंच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा समावेश नव्या वर्किंग कमिटीत नसल्याचं दिसत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी प्रचारासाठी थेट संगमनेरला आले होते. त्या निवडणुकीवेळी ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचे चित्र होते. अशा परिस्थितीत थोरात निष्ठेने पक्षासोबत राहिले. शिवाय थोरात हे गांधी परिवाराच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यावेळी संगमनेरमध्ये मुक्काम केला होता. थोरात यांना मोठी संधी मिळणार, हे तेव्हा बोलले गेले. पुढे तसेच झाले.

बाळासाहेब थोरात यांना राज्यात तर संधी मिळालीच पण थोरात यांना पक्षाच्या राष्टीय समितीवर घेण्यात आले होते. मधल्या काळात अनेक घडामोडी झाल्या. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. ते स्थापन करण्यात थोरात यांचा मोठा सहभाग राहिला. पुढे ते सरकारही गेले. परंतु अलीकडेच विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निव़डणूक झाली. त्यामध्ये थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केली. त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर सत्यजित यांचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्यात आला. सत्यजित भाजपसोबत जाणार, अशी चर्चा होती. त्यावेळी रुग्णालयात असलेले थोरात यांचीही त्यांना साथ असल्याचे मानले जात होते. सत्यजित थेट भाजपमध्ये गेले नसले तरी भाजपच्या पाठिंब्याने ते विजयी झाले. पक्षाने तांबे यांच्यावर कारवाई केली. थोरात यांनाही टीका आणि चौकशीला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि थोरात यांच्यात बराच संघर्षही झाल्याचे पहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *