ताज्याघडामोडी

महावितरणने शेतकऱ्यांशी समन्वय साधून काम करावे – आ.समाधान आवताडे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी अर्थिक अडचणीत आला आहे. अशा अस्मानी आणि सुलतानी संकटाला तोंड देत असतानाच महावितरण विभागाने शेतकऱ्यांशी समन्वय ठेवून आपली कार्यपद्धती सुरु ठेवावी असे पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा लोकप्रतिनिधी आ. समाधान आवताडे यांनी सूचित केले आहे.

महावितरण उपविभाग मंगळवेढा येथील आधिकारी, पदाधिकारी व शेतकरी यांची आ. समाधान आवताडे मंगळवेढा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली. मौजे सिद्धापूर येथे नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्र मंजूर झाले असून त्या मंजूर विद्युत प्रकल्प सुरु करण्यासंदर्भात सदर बैठकीत चर्चा करून हा प्रकल्प लवकरात – लवकर सुरु करण्याच्या सूचना आ. आवताडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

त्याचबरोबर उचेठाण येथील पोल शिफ्टिंग अनुषंगाने विविध बाबींचा आढावा या बैठकीत अधिकाऱ्यांनी आ समाधान आवताडे यांच्यापुढे सादर केला. मंगळवेढा तालुक्यामध्ये एकुणात्मक किती वीजभार आहे, तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात किती ट्रान्सफार्मर मंजूर आहेत, ६३ केव्ही व १०० केव्ही विद्युत डिपींची इतंभूत माहिती व अतिरिक्त डी. पी. किती बसवावे लागतील यांची संख्या, ६० केव्ही च्या ठिकाणी १०० केव्ही चे किती डी. पी. असावेत या विषयांवर सदर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

तालुक्यात बहुतांशी ठिकाणी वीज बिल थकबाकीसाठी महावितरणकडून शेतकऱ्यांची अर्थिक स्थिती लक्षात घेऊन कार्यवाही करावी असेही आ. समाधान आवताडे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित शेतकरी यांनी आपल्या समस्या आणि अडचणी मांडल्या असता आ. समाधान आवताडे यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत योग्य तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरण यांनी एकमेकांशी समन्वय साधत निंबोणी व पाटखळ येथील अडथळा निर्माण करणारे पोल दूर करून वीजप्रवाह अखंडितपणे सुरु होण्यास सहकार्य करावे असेही आ. समाधान आवताडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग उपकार्यकारी अभियंता यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून सांगितले.

 सद्या कालखंडात पावसाने खूप मोठी उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना उभी पिके जगविण्यासाठी साठा केलेले पाणी पिकांना देण्यासाठी विजेची खूप मोठी नितांत गरज असल्याने महावितरण विभागाने यासंदर्भात लवचिकतेची भुमिका घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील रहावे असेही आ. समाधान आवताडे यांनी या बैठकीत सांगितले.

यावेळी महावितरण उपकार्यकारी अभियंता शिंदे यांनी सांगितले की, सद्या जिल्हा नियोजन मंडळ यांचेकडून मंगळवेढा तालुक्यासाठी ४ कोटी ५०लाख आसपास निधी आलेला असून सदरील निधीमधून वरील सर्व मागण्यांची पूर्तता करण्यासाठी लवकरच प्रस्ताव तयार करून लोकप्रतिनिधींना दाखवून पुढील कार्यवाही करत असल्याचे सांगितले. तसेच उचेठाण येथील पोलचा मानवी जीवितास धोका असल्याने सदरील काम हे लवकरच करत असल्याचे सांगितले.

सदर बैठकीस भाजपा जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, माजी सभापती प्रदीप खांडेकर, माजी उपसभापती शिवाजी पटाप, संचालक राजेंद्र पाटील, बापूराव काकेकर, येड्रावचे सरपंच रमेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, नंदकुमार जाधव,नागेश मासाळ, भाजपा जिल्हा चिटणीस गौडाप्पा बिराजदार, माजी नगरसेवक खंडू खंदारे, बबलु सुतार, संजय बेदरे, महावितरण उपविभागीय अधिकारी एस. सी. शिंदे यांचेसह अधिकारी – पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *