गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

संपत्ती हडपण्यासाठी आईलाच दाखवलं मयत; अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई

बुलडाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील पळसखेड याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने संपत्ती हडपण्यासाठी आपल्या सावत्र आईलाच मयत दाखवलं आहे.

आरोपीनं आपल्या सावत्र आईला मयत दाखवून तिच्यावर नावावर असलेली शेतजमीन आपल्या नावावर करून घेतली आहे. पण त्याचा डाव फार काळ टिकला नाही. हे प्रकरण लक्षात येताच उपविभागीय अधिकारी गणेश राठोड याने लालची मुलाला चांगलाच दणका दिला आहे.

अंबादास कुंडलिक जायभाये असं संबंधित तरुणाचं नाव असून तो लोणार तालुक्यातील पळसखेड येथील रहिवासी आहे. आरोपी मुलाने 10 जून 2020 रोजी सावत्र आईला मयत दाखवून हिरवड तलाठी कार्यालयात जाऊन आईच्या नावे असलेली 77 आर जमीन स्वत:च्या नावे वारस म्हणून केली होती. पण उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी कारवाई करत मुलाचा प्लॅन उधळून लावला आहे

नेमकं प्रकरण काय आहे?

अंबादास कुंडलिक जायभाये याच्या सख्ख्या आईचं नाव गयाबाई जायभाये असं होतं. सख्ख्या आईच्या निधनानंतर अंबादास जायभाये याच्या वडिलांनी अन्य एका महिलेशी विवाह केला होता. लग्नानंतर सावत्र आईचं नाव देखील गयाबाई ठेवण्यात आलं. यानंतर सावत्र आईने 1994 साली 77 आर शेतजमीन विकत घेतली होती. सावत्र मुलाचा यावर डोळा होता.

सख्ख्या आणि सावत्र आईच्या नावात साम्य असल्याने त्याने सावत्र आईची जमीन हडपण्याचा कट रचला. त्यासाठी आरोपीनं हिरवड तलाठी कार्यलयात जाऊन आईचं निधन झाल्याचं सांगितलं, त्यासाठी सख्ख्या आईच्या निधनाची कागदपत्रे सादर केली. आणि वारसदार म्हणून सावत्र आईच्या नावावर 77 आर जमीन आपल्या नावावर करून घेतली. पण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर, पुढील कारवाई केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *