ताज्याघडामोडी

महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा; ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतो आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे. अशात मध्यंतरी काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे दुबार पेरणीचं संकटही ओढावलेलं. मात्र, आता सातत्याने होत असलेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती ओढावली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशात आजचा दिवसही महत्त्वाचा आहे. कारण, हवामान खात्याकडून आत राज्यातील ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा आणि कोल्हापूर तर गडचिरोलीला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातही गेले काही दिवस जोरदार पाऊस सुरू आहे. रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधारा सुरू आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पडझडीत नुकसान झाल्याचा घटना घडल्या आहेत. अनेक रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून रत्नागिरी व रायगडमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाने काही जिल्ह्यांना चांगलंच झोडपून काढलं आहे. तर काही जिल्ह्यांत अजूनही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका आणि सुरक्षित स्थळी थांबा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आयएमडीनुसार जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि चंद्रपूर या ५ जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतकंच नाहीतर नंदुरबार, धुळे आणि सांगलीमध्ये पावसाचा जोर अतिशय कमी असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *