ताज्याघडामोडी

“काय होतास तू? काय झालास तू?”; देवेंद्र फडणवीसांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली

भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची आजची बैठक चर्चेचा विषय ठरली ते देवेंद्र फडणवीसांमुळे. त्यांनी आजच्या बैठकीत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. भ्रष्टाचार, महिला सुरक्षा, अमरावती हिंसाचार अशा अनेक मुद्द्यावर भाष्य करत त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.

याबरोबरच त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही टोला लगावत खोचक टीका केली आहे. काय होतास तू काय झालास तू अशा शब्दात त्यांनी संजय राऊतांची खिल्ली उडवली आहे.

राऊत यांची अवस्था कोण होतास तू…काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू…अशी झाल्याची जळजळीत टीका त्यांनी केली. राज्यात अमरावती, मालेगावमध्ये निघालेले मोर्चे हे नियोजन करून निघाले. त्याला सरकारचे समर्थन होते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. पेटलेला महाराष्ट्र, नक्षलवाद आणि राजकारण याविषयांवरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच घेरलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “८ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले. त्यात त्रिपुरात खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार सुरू असल्याचा उल्लेख होता. त्यानंतर लगेच दोन दिवसांमध्ये ११ नोव्हेंबर रोजी मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मोर्चे निघाले, असा दावा त्यांनी केला.

कुणाच्या ध्यानीमनी नसता इतके मोठे मोर्चे कसे काय निघतात? नियोजनाशिवाय हे मोर्चे निघणे शक्यच नाही. नियोजन झाले असेल तर सरकार, आयबी, गुप्तचर यंत्रणा, पोलिसांना कसे काय माहित नाही? सरकारच्या समर्थनाने हे मोर्चे निघाले. हा पद्धतशीरपणे ध्रुवीकरणाचा प्रयोग आहे.

या मोर्चामध्ये निवडून हिंदूंची दुकाने जाळली गेली. दुकान कुणाचेही जाळणे ते चुकीचेच. मात्र, या साऱ्या हिंसाचारावर महाविकास आघाडींच्या नेत्यांची तोंडे शिवली गेली. त्यात संजय राऊतांची अवस्था कोण होतास तू… काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू…अशी झाली आहे”.

फडणवीस पुढे म्हणाले, “अमरावतीमध्ये जवानांच्या सात कंपन्या होत्या. मोर्चा निघाला. तोडफोड झाली. मात्र, पहिल्यांदा त्यांना आदेशच आला नाही. त्यानंतर आदेश दिला त्यावेळी त्या कंपन्यांवर हल्ला झाला हा पॅटर्न समजून घ्या. जवानांवर अचानक टोकदार गोटे फेकण्यात आले. हे दगड जमा करून ठेवलेले नव्हते, तर ते आले कसे?

पोलिस आणि जवानांवर हल्ला केल्यानंतर एका माणसालाही अटक नाही. या पोलिसांवर ठरवून हल्ला केला. हा पॅटर्न तुम्ही समजून घ्या. नरेंद्र मोदी यांच्या विकासाला उत्तर देता येत नाही म्हणून लोकांमध्ये गोंधळ निर्माण करा. आजूबाजूच्या राज्यातल्या लोकांना त्यात ओढा, असा प्रकार सुरू आहे”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *