ताज्याघडामोडी

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात सेन्सर्सचे एम्बेडेड सिस्टिम्ससोबत एकत्रीकरण विषयावरील कार्यशाळा संपन्न

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय (कोर्टी, पंढरपूर) येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग व इनोव्हेशन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने “सेन्सर्सचे एम्बेडेड सिस्टिम्ससोबत एकत्रीकरण” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना सेन्सर्स व एम्बेडेड सिस्टिम्स यांच्यातील परस्परसंबंध, त्यांचे प्रत्यक्ष अनुप्रयोग तसेच औद्योगिक क्षेत्रातील वापर याबाबत सखोल ज्ञान देणे हा होता. द्वितीय वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहाने सहभाग नोंदविला.
कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील “अंतर्निहित प्रणाली विकासक” श्री. विनायक आयवळे उपस्थित होते. त्यांनी विविध प्रकारचे सेन्सर्स, त्यांची कार्यपद्धती, मायक्रोकंट्रोलरसह सेन्सर्सची जोडणी प्रक्रिया, डेटा संकलन व विश्लेषण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना सेन्सर इंटरफेसिंग, प्रोग्रामिंग आणि सर्किट डिझाइन याबाबत प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागत प्रा. राहुल घोडके यांनी केले. विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी नवोन्मेषी विचारसरणी स्वीकारून तांत्रिक ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत करावे, असे प्रतिपादन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली.
कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर पडून संशोधन व प्रकल्पनिर्मितीस चालना मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कु. भक्ती गवळी हिच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *