ताज्याघडामोडी

रोहितला त्रास होईल म्हणून ऐकून घेतोय, नाही तर हिसका दाखवला असता; अजितदादा भडकले

कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून होत असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी त्यांचे भाषण सुरू असताना प्रेक्षकांमधून काही जण विविध मागण्या व सूचना करत होते. शेवटी अजित पवार यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये त्यांचा समाचार घेतला. ‘तुला लईच कळतंय रं. येथे येऊन भाषण कर. आमच्या बारामतीत मी बोलायला लागलो की सगळे चिडीचूप असतात. येथे उगीच रोहितला त्रास होईल म्हणून ऐकून घेतोय, नाही तर हिसका दाखविला असता,’ अशा शब्दांत मध्येमध्ये बोलणाऱ्यांना अजितदादांनी सुनावले.

या कार्यक्रमात पवार यांनी आमदार रोहित पवार यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. कामांची माहिती देत असताना प्रेक्षकांमधून काही जण त्यांना सूचना करीत होते. वीज पुरवठा, शेतीमालाचा भाव वगैरे संबंधी मुद्दे मांडत होते. एक दोनदा दुर्लक्ष केल्यानंतर अखेर पवार भडकलेच.

एकाला उददेशून ते म्हणाले, ‘तुला लईच कळतंय रं. येथे येऊन भाषण कर. आम्ही काय असेच उठून आलेलो नाही. सात वेळा दीड दीड लाख मते घेऊन निवडून आलो आहोत. आमच्या बारामतीत असे कोणी मध्ये बोलत नाही. मी बोलत असताना लोक चिडीचूप असतात. येथे मध्ये मध्ये बोलायची सवय आहे. उगीच रोहितला त्रास व्हायला नको म्हणून ऐकून घेतो. नाही तर माझा हिसका दाखविला असता. ऐकून घेतोय तर मध्ये मध्येच बोलतात,’ असे पवार यांनी सुनावल्यानंतर सगळेच शांत झाले.

राम शिंदेंनाही लगावला टोला

कामांवरून श्रेयवादाचे राजकारण या मतदारसंघात चालते. त्याचा संदर्भ देत अजित पवार यांनी भाजपचे माजी आमदार राम शिंदे यांनाही टोला लगावला. ‘रोहित पवार यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका. जी कामे तुम्ही केली, ती आम्ही मान्य करतो, तशी आमची कामे तुम्ही मान्य करा.

लोकांनी तुम्हाला नाकारले आहे. आता गपगुमान बसा. आपण कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करा. त्यातून बोध घ्या. चांगल्या कामाचे कौतुक करायला शिका. फुकटचे श्रेय घेऊ नका. उगीच ढुसण्या देत बसण्यात काय अर्थ आहे?,’ असा चिमटाही पवार यांनी शिंदे यांना काढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *