

“अनवाणी” आत्मकथनाने संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले लेखक अंकुश गाजरे यांच्या “सारिपाट” या कथासंग्रहाचे प्रकाशन पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते संपन्न झाले.. पुणे येथील मांजरी येथे सन्मती बालनिकेतन येथे माईंच्या हस्ते पुस्तक प्रकाशन संपन्न झाले..
“मी तुझ्या कथा नेहमी ऐकत असते, तू खूप काळजातून लिहितोस लेकरा, तुझं लिखाण काळीज चिरत जातं, गरिबांचं दुःखं लिही.. तुला काही कमी पडणार नाही” असा आशीर्वादही यावेळी माईंनी अंकुश गाजरे यांना दिला..
अंकुश गाजरे यांच्या सारीपाट कथासंग्रहात भेटणारी पात्रं ही एखाद्या संकटात हारत नाहीत, डरत तर अजिबात नाहीत.. ती उठतात.. पुन्हा उभा राहतात.. जिंदगीच्या सारिपाटावर स्वतःच्या स्वप्नांचे दान टाकत नवा डाव उभा करतात..
काही दिवसांपूर्वी सिंधुताई सपकाळ यांनी अंकुश गाजरे यांची ‘वाट’ कथा युट्युबर ऐकून त्यांना फोन केला होता, त्यावेळी त्या ‘वाट’ कथेबद्दल भरभरून बोलल्या होत्या, त्याच कथेचा समावेश असलेला “सारिपाट” हा कथासंग्रह असून या संग्रहाचे प्रकाशन माईंच्या हस्ते झाल्याने मी समाधानी झाल्याचे अंकुश गाजरे सांगतात..
पुस्तक प्रकाशन वेळी जेष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र पाटील, बळीराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गाजरे आदी. मान्यवर उपस्थित होते..