

वारंवार पोलीस कारवाया आणि तरीही सातत्याने होत असलेला अवैध वाळू उपसा हा शहर तालुक्यात चर्चेचा विषय झाला असून या साऱ्या घडामोडीत ज्यांच्याकडे या गौण खनिजाची मालकी आहे त्या महसूल प्रशासनाचे कर्मचारी मात्र सहसा कुठे कारवाई करताना दिसून येत नाहीत.गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत पंढरपूर शहर व तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर झालेल्या कारवायांचा आढावा घेतला तर बहुतांश कारवाया या पोलीस कर्मचार्यांनी केलेल्या असल्याचेच दिसून येईल.महसूल प्रशासनाच्या अधिनस्त असलेले तलाठी,मंडल अधिकारी,पोलीस पाटील यांनी स्वतःहून केलेल्या कारवायांचे प्रमाण अतिशय नगण्य असतानाच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दंडात्मक कारवाया करण्यातही महसूल प्रशासनातील काही कर्मचारी टाळाटाळ करतात कि काय अशी शंका व्यक्त होते.
दिनांक २१ ऑक्टोबर रोजी पंढरपुर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी भटूबरे तालुका पंढरपूर येथे कारवाई करत 4,04,000/- रू किंमतीचे एक राखाडी रंगाचा अशोक लेलंड कंपणीचे पिकअप वाहन ( आर.टी ओ.MH-09 FL 2730 ) हौदातील अर्धा ब्रास वाळुसह ताब्यात घेतले असून पिकअपचे अज्ञात चालक व मालक यांचेविरूद्ध भादवि 379,34 सह गौण खनिज कायदा कलम 4(1)4(क)(1) व 21, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा 1984 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.