ताज्याघडामोडी

पंढरपूर नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रवादी कॉग्रेसची विचार विनिमय बैठक

पक्षांतर्गत गटबाजीला मिळणार पूर्णविराम ?

पंढरपूर नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉग्रेसने बुधवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी इसबावी येथील जिजाऊ मंगल कार्यालय येथे विचार विनिमय बैठकीचे आयोजन केले आहे.

या बैठकीस राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळूंखे,जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.  गतवर्षी पुणे विभाग विधान परिषदेत धक्कादायक पराभव पदरी पडलेल्या भाजपामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ठ्रवादी कॉग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा अवघ्या सव्वातीन हजार मतांनी पराभव झाल्यानंतरपुन्हा चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.

पंढरपूर शहरातून भाजपचे उमेदवार समाधान आवताडे याना साडेतीन हजार मताधिक्य मिळाले होते.मात्र याच वेळी राष्ट्रवादी कॉग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा फटका भगीरथ भालके याना बसल्याचा दावाही भालके समर्थक पदाधीकारी व कार्यकर्ते करताना दिसून  येत होते.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकदिलाने एकत्र लढल्यास भाजपचा पराभव शक्य आहे अशी भूमिका महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची असली तरी कॉग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष धवलसिह मोहिते पाटील यांनी केली आहे तर शिवसेनेच्या गोटात तूर्तास तरी सामसूम आहे.त्यामुळे बुधवारी होणाऱ्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या बैठकीत पंढरपुर नगर पालिका निवडणूक पक्षांतर्गत गटबाजीस पूर्णविराम देत राष्ट्रवादी कॉग्रेस एकदिलाने निवडणूक लढविण्यावर शिक्कामोर्तब करेल अशीच शक्यता वर्तविली जात आहे.

नगर पालिकेत सत्तांतर घडवून भगीरथ भालके विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा काढतील असा आत्मविश्वास भगीरथ भालके समर्थक व्यक्त करीत असले तरी सोलापुरात शरद पवार यांच्या परवाच्या हुतात्मा स्मृती मंदिरातील बैठकीस जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सारे नेतेगण,पदाधिकारी झाडून उपस्थित असताना या बैठकीस देखील अनुपस्थित असलेले भगीरथ भालके या बैठकीस तरी उपस्थित राहणार का हेही पाहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *