ताज्याघडामोडी

महाराष्ट्रावर लोडशेडिंगचे संकट, कोळसा टंचाईमुळे महावितरणला वीज पुरवणारे 13 औष्णिक संच बंद

राज्यासह देशातील कोळसाटंचाईचे संकट आणखी गडद झाले आहे. महावितरणला वीजपुरवठा करणाऱया औष्णिक वीज केंद्रांतील 3330 मेगावॅट क्षमतेचे जवळपास 13 वीज संच कोळशाअभावी बंद पडले आहेत.

त्यामुळे राज्यावर लोडशेडिंगचे संकट आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी विजेची मागणी जास्त असताना सकाळी आणि सायंकाळी 6 ते 10 या वेळेत विजेचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

कोळसाटंचाईमुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मितीत घट होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱया महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी 210 मेगावॅटचे तीन संच कोळशाअभावी बंद झाले आहेत. पारस 250 मेगावॅट, भुसावळ व चंद्रपूर येथील 500 मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. तसेच कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) 640 मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) 810 मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱया विजेमध्ये घट होत आहे. त्यामुळे विजेची दैनंदिन मागणी पूर्ण करताना महावितरणला कसरत करावी लागत आहे.

खुल्या बाजारातून वीज खरेदी

विजेच्या मागणी व उपलब्धता यामधील सध्या 3330 मेगावॅटची तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून (पॉवर एक्स्चेंज) वीज खरेदी सुरू आहे. देशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीज खरेदीचे दर वाढले असून 700 मेगावॅट वीज 13 रुपये 60 पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात येत आहे. तर आज सकाळी रियल टाइम व्यवहारातून 900 मेगावॅट विजेची 6 रुपये 23 पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना व इतर जलविद्युत केंद्र आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांद्वारे जास्तीत जास्त वीजनिर्मिती करण्यात येत आहे.

ऑक्टोबर हीटमुळे विजेच्या मागणीतही वाढ

कोळसाटंचाईचे संकट गडद होत असतानाच राज्यात ऑक्टोबर हीटमुळे विजेच्या मागणीतदेखील वाढ झाली आहे. शनिवारी महावितरणकडे 17 हजार 289 मेगावॅट एवढी विजेची मागणी नोंदली असून आज सुट्टीचा दिवस असतानाही सकाळी 11.30 वाजता राज्यात 15 हजार 800 मेगावॅट एवढी मागणी नोंदली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *