व्यवसायासाठी 10 लाखाचे कर्ज मिळवून देण्याचा बहाणा करून बँक मॅनेजरसह तिघांनी मिळून एका शेतकऱ्याची 45 लाखांची फसवणूक केली आहे. आरोपींनी शेतकऱ्याच्या कर्ज प्रकरणासह कोऱ्या धनादेशावर सह्या घेऊन 45 लाखांचे कर्ज मंजूर करून घेत फसवणूक केली.
लबाडीने कर्ज घेणाऱ्या बँकेचा तत्कालीन व्यवस्थापक अजय प्रसाद, प्रकाश विठ्ठल पाटील, स्वानंद प्रकाश पाटील, परिमल प्रकाश पाटील अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सांगली येथील बांबवडे गावातील शेतकऱ्याने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांना व्यावसायासाठी 10 लाख कर्ज घ्यायचे होते. कर्ज मिळवून देण्यासाठी ते शिवाजीनगर वाकडेवाडीमधील पंजाब अॅण्ड सिंध बँकेत गेले होते. तेथे त्यांची ओळख अजय प्रसादशी झाली. त्यांनी साथीदारांसोबत मिळून शेतकऱ्याला कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी यांनी कर्ज प्रकरणावर आणि कोऱ्या धनादेशावर सह्या केल्या.
याच दरम्यान फिर्यादीच्या नावावर त्यांनी 45 लाखांचे कर्ज मंजूर करून घेत फसवणूक केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी खडकी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मोहन साळवी तपास करीत आहेत.