ताज्याघडामोडी

पती उपाशी ठेवायचा, शिवीगाळ-मारहाण, खचलेल्या तिने टोकाचा निर्णय घेतला, दोन मुलांसह जग सोडलं

माहेरवरून पैसे आणण्यासाठी पती सतत त्रास देत असल्याने छळाला कंटाळून महिलेने आपल्या दोन मुलांसह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे सोमवारी सायंकाळी घडली. रेशमा नितीन मुडे (वय २७), श्रावणी नितीन मुडे (वय ६) आणि सार्थक उर्फ निहाल नितीन मुडे (वय ४) अशी मृतकांची नावे आहे. याप्रकरणी बिटरगाव पोलिसांनी महिलेचा पती नितीन किसन मुडे (वय २८) आणि सासरा किसन हेमाला मुडे (वय ५५) या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली.

महागाव तालुक्यातील धानमुख येथील वसंत टीकाराम राठोड यांच्या मुलीचा विवाह नितीन मुडे यांच्याबरोबर झाला होता. सुरुवातीला त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. त्यांना दोन मुले झाली. पण, नंतर नितीनला दारूचे व्यसन लागले. माहेरवरून पैसे आणण्यासाठी रेशमाचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. उपाशी ठेवणे आणि शिवीगाळ करत मारहाण करणे सुरू झाले.

वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रेशमा छळ सहन करत होती. घटनेच्या दिवशी १४ ऑगस्ट रोजी नितीनचा आणि तिचा वाद झाला. त्यानंतर दुपारी रेशमाने आपल्या दोन्ही मुलांना विष पाजले आणि स्वत:ही विष प्राशन केले. शेजाऱ्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने सवना येथे शासकीय रुग्णालयात हलविले. त्याठिकाणी रेशमा आणि श्रावणी या मायलेकींचा मृत्यू झाला. मुलगा गंभीर असल्याने त्याला पुसद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी रात्री उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच रेशमाच्या वडिलांनी रुग्णालयात धाव घेतली. मंगळवारी वडील वसंत राठोड यांनी बिटरगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हे दाखल करून पती आणि सासऱ्याला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *