पुणे शहरातील धानोरी परिसरात गुंडप्रवृत्तीच्या एका रिक्षाचालकाने पोलिसाच्या अंगावर रिक्षा घालून त्यांना गंभीर जखमी केले. त्याशिवाय रिक्षाची धडक देउन सरकारी दुचाकीचेही नुकसान केले आहे.
घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडाला. जखमी कर्मचाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस शिपाई दीपक राजमाने (वय 45) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार गणेश शिरसाट यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलीस अमलदार गणेश शिरसाट आणि दीपक राजमाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या एका नागरिकाने पोलिसांना सोसायटीसमोर असलेली रिक्षा अज्ञात घेउन जात असल्याचे सांगितले. त्यामुळे बीट मार्शल दीपक राजमाने व गणेश शिरसाट यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी एकजण रिक्षा घेऊन चालला असल्यामुळे पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, चालकाने रिक्षा दामटल्यामुळे गणेश यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर दीपक राजमाने यांनी एका वाहनचालकाची मदत घेउन रिक्षाच्या पुढे रस्त्यावर उभे राहून चालकाला थांबण्यास सांगितले. मात्र, आरोपी रिक्षाचालकाने दीपक यांच्या अंगावर रिक्षा घालून पसार झाला.