गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गुन्ह्याच्या तपासात मदतीसाठी स्विकारली 10 हजारांची लाच; ASIसह पोलीस नाईक ताब्यात

अपघात प्रकरणी दाखल गुन्ह्यांत तपासात मदत करण्यासाठी सहायक उपनिरीक्षकाने आरोपीकडे दहा हजार रूपयांची मागणी केली. तसेच ती लाच पोलीस नाईक कर्मचार्‍याच्या हस्ते घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पथकाने सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले.अभिरूची पोलीस चौकीसमोर मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.

श्रीपती माणिक कोलते (वय 55, सहायक पोलीस उपनिरीक्षक) आणि शिवाजी बाळासाहेब जगताप (वय 34, पोलीस नाईक ) असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. दोघे हवेली पोलीस ठाणे येथे नेमणुकीस आहेत. त्यांच्याविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.अपघात प्रकरणात 33 वर्षिय तक्रारदारावर हवेली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात त्यास आवश्यक ती मदत करण्यासाठी सहायक उपनिरीक्षक श्रीपती कोलते यानी त्याच्याकडे दहा हजार रूपये लाचेची मागणी केली. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाच मागणार्‍या पोलिसांविरोधात तक्रार अर्ज दिला होता. लाचलुचपतच्या पथकाने मागील महिन्यात 26 ऑगस्ट रोजी तक्रारीची पडताळणी केली.

त्यानंतर मंगळवारी दि. 21 सप्टेंबर रोजी सापळा लावला. कोलते यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम पोलीस नाईक शिवाजी जगताप यांच्याकरवी स्विकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यत घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल क्षीरसागर हे करीत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *