ताज्याघडामोडी

शिवसेनेचे माजी खासदार अडसूळ यांच्यासह मुलगा आणि जावयाच्या घरांवर ईडीचे छापे

ईडीने बुधवारी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांच्या मुलाच्या आणि जावयाच्या घरावर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या. एकूण सहा ठिकाणी ईडीने छापे टाकले. मुंबईतील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा केल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने ही कारवाई केली.

आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार करत सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेंशनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम आणि गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे ईडीने बुधवारी अडसूळ यांचे चिरंजीव माजी आमदार आणि बँकेचे संचालक अभिजित अडसूळ तसंच अडसूळ यांचे जावई यांच्या घराची, कार्यालयाची ईडीने झाडाझडती घेतली. ईडीला चौकशीदरम्यान आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे हाती लागल्याची माहिती आहे.

राणांद्वारे कथितरित्या पसरविल्या जाणाऱ्या बातम्यांना बळी पडू नये – अडसूळ

आनंदराव अडसूळ यांनी ईडीच्या कारवाईनंतर प्रतिक्रिया दिली. आमदार रवी राणा यांनी माझ्या विरुद्ध केलेल्या कथीत तक्रारी प्रकरणात ईडीने छापे टाकलेले नाहीत. ईडीद्वारे करण्यात आलेल्या चौकशीला संपूर्ण सहकार्य आम्ही केले असून झालेल्या चौकशीत सत्य काय ते निष्पन्न झालेलं आहे. प्रत्येकवेळी खासदार नवनीत राणा यांच्याविरुद्ध माझ्या याचिकेमध्ये सुनावणी असताना ईडीद्वारे नोटीस देऊन चौकशीला त्याच तारखेला बोलावण्यात येते असं उच्च न्यायालयाच्या प्रकरणांमध्येही झालं आहे, असं अडसूळ म्हणाले.

न्यायालयात नवनीत राणा यांच्याविरुद्ध बनावट जात प्रमाणपत्र विषयी असलेली याचिकेवर सुनावणी असते त्याचदिवशी जाणीवपूर्वक ईडीचे अधिकारी माझ्या निवासस्थानी पाठवण्यात आले होते. केंद्राकडून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा दाम्पत्यांच्या प्रेमापोटी वापरण्यात येणाऱ्या दबावतंत्राला मी घाबरणार नाही. आमदार राणांद्वारे कथितरित्या पसरविल्या जाणाऱ्या बातम्यांना बळी पडू नये आणि माध्यमांनीही जनतेसमोर वस्तुस्थिती ठेवावी असं आनंदराव अडसूळ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *