३१ मार्च पर्यंत निवडणुका स्थगित करण्याचा आदेश मागे
पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या विठ्ठल सह्कारी साखर कारखान्यासह तालुक्याच्या राजकारणाचे बलस्थान असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली होती मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने जून २०२० मध्ये घेतला होता.३१ डिसेंबर नंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु होईल असा अंदाज व्यक्त केला जात असतानाच १६ जानेवारी रोजी शासनाने पुन्हा आदेश काढून सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्च २०२१ पर्यंत स्थगित केल्या होत्या.मात्र राज्यातील लोकप्रतिनिधी व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरु करावी असा आग्रह धरल्याने अखेर शासनाने आज १६ जानेवारीचे आदेश मागे घेत निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश २ फेब्रुवारी रोजी सहकार आयुक्तांना व राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास दिले आहेत.
विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा पंढरपूर तालुक्यातील राजकारणाचा दुसरा ध्रुव समजला जातो.जशी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या नेतृत्वांनी पंढरपूर तालुक्याच्या राजकरणात प्रभावी भूमिका बजावली आहे तसेच पंढरपूर तालुक्याच्या कृषी औधोगिक क्रांतीचे प्रतीक म्हणून या कारखान्यास शेतकऱ्यांचा राजवाडा असे संबोधले जाते.२००२ ते २०२० असे अठरा वर्षे या कारखान्याचे चेअरमन म्हणून स्व.आमदार भारतनाना भालके यांनी जबाबदारी पार पाडली आहे.त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भालकेयांनी चेअरमनपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.गत हंगामात आर्थिक अडचणीमुळे स्थापनेपासून पहिल्यांदाच कारखाना बंद ठेवावा लागला होता तर कारखान्यास आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी स्व.भारतनाना भालके यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली होती.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत गेल्या दीड महिन्यापासून चर्चा सुरु होती मात्र १६ जानेवारीच्या आदेशानंतर आता या निवडणुका ३१ मार्चनंतरच जाहीर होतील असे समजले जात होते.मात्र आता पुन्हा निवडणूक प्रक्रिया चर्चेत आली असून याचवेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सत्तांतर घडवुन आणण्यासाठी कारखान्याचा मागील अनेक वर्षाचा ”ताळेबंद” हाती घेऊन व सभासदांना व्यक्तीश: भुमीका समजावून सांगत विरोधकही तयारीत असल्याचे दिसून येत आहे.