शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यामुळे खळबळ उडाली आहे. अनिल परब यांना मंगळवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.सचिन वाझे प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अनिल परब यांनी ईडीने नोटीस बजावली असून मंगळवारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. काही दिवसांपूर्वी सचिन वाझेनं त्याच्या जबाबात अनिल परब यांचे नाव घेतले होते.
परब यांनी बीएमसी ठेकेदारांची माहिती दिली होती. याच प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. सचिन वाझे याने 3 एप्रिल रोजीच्या सुनावणीत आपल्याला न्यायालयाला काही सांगायचे आहे, असं म्हटलं होतं. त्यावेळेस न्यायालयाने वाझेला सांगितले होते की, आपले म्हणणे लेखी स्वरुपात द्या.
त्यानंतर आज सचिन वाझेनं लेखी पत्र दिलं होतं. यात;पोलीस दलात पुन्हा नियुक्त व्हायचे असेल तर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्याच प्रमाणे अनिल देशमुख व्यतिरिक्त महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्यावरही सचिन वाझे याने गंभीर आरोप केले होते. सचिन वाझे याने लिहिलेल्या ४-५ पानी पत्रात मुंबई महानगर पालिकेचे कंत्राटदार, मुंबईचे बार रेस्टॉरंट मालक यांच्याकडून लाखो रुपये वसूल करण्याचा दबाव सचिन वाझे वरती केला होता असा आरोप पत्रात केला आहे.
मला परत पोलीस खात्यात नियुक्ती करण्यास शरद पवारांचा विरोध होता. परंतु तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांची मनधरणी करणार आहोत आणि त्यासाठी अनिल देशमुख यांनी दोन करोड रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाजे याने पत्रात केला होता. सध्या आपली परिस्थिती दोन करोड रुपये देण्याची नसल्याची सचिन वाजे याने गृहमंत्र्यांना सांगितलं होतं.
त्यावरती तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भविष्यात पैसे चुकते करण्याचे सचिन वाजे याला सांगितले होते असा दावा सचिन वाझेनं पत्रात केला. अनिल परब हे आपल्या मार्फत बरीचं काम करवून घेत असल्याचा दावा देखील सचिन वाझे याने पत्रात केला. पत्रात दिलेल्या माहितीप्रमाणे, सचिन वाजे लिहितो की अनिल परब यांनी मुंबई महापालिकेतील कंत्राटदारांकडून पैसे वसूल करण्याचे निर्देश दिले होते. प्रत्येकी दोन करोड रुपये प्रत्येक कंत्रादारांकडून करून वसूल करण्याचे आदेश दिले होते आणि अशा 50 कंत्राटदारांची यादी ही सचिन वाझे याला अनिल परब याने दिली होती, असं ही पुढे सचिन वाझेने पत्रात लिहिले होते.