ताज्याघडामोडी

नारायण राणेंची छत्रपती संभाजी महाराजांची तुलना, शिवसेना आक्रमक, वैभव नाईकांकडून तक्रार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर आणखी एका भाजप नेत्याचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कोकणातील भाजप नेते प्रमोद जठार यांनी नुकत्याच घडलेल्या राजकीय नाट्यादरम्यान नारायण राणे आणि छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना केली होती.

याविरोधात आता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आहे. प्रमोद जठार यांनी त्यांची तुलना नारायण राणे यांच्याशी केली. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून आपण त्याविरोधात कणकवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलीस योग्य ती कारवाई करतील असा विश्वास असल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले.

तसेच जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका सुरुच ठेवल्यास शिवसेना यात्रेला विरोध करेल, अशा इशाराही वैभव नाईक यांनी दिला. शिवसेनेचा जन आशीर्वाद यात्रेला विरोध नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सातत्याने राणे यांच्याकडून टीका होत असल्याने आम्ही विरोध करत आहोत. अटक झाल्यामुळे आता नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा. ती सिंधुदुर्गाची परंपरा आहे. सुरेश प्रभू आणि मधू दंडवते यांनी यापूर्वी अशाप्रकारे राजीनामे दिले होते, याकडे वैभव नाईक यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

प्रमोद जठार नेमकं काय म्हणाले?

प्रमोद जठार यांनी 24 ऑगस्ट रोजी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावेळी प्रमोद जठार यांनी म्हटले होते की, छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेबाचे राज्य संपले. नारायण राणे हे सुद्धा छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि ठाकरे सरकार हे औरंगजेबाचे राज्य आहे, असा प्रमोद जठार यांच्या वक्तव्याचा हेतू आहे. अशा प्रकारे तुलना केल्याने तक्रारदार यांचे असंख्य अनुयायी व शिवसैनिक यांच्या भावना दुखावल्याचे या पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *