ताज्याघडामोडी

बजाज फायनान्सच्या वसुलीला महर्षी वाल्मिकी संघाचा कडाडुन विरोध; जोपर्यंत विठ्ठल मंदिर उघडत नाही तोपर्यंत एक रुपयाही भरणार नाही!- गणेश अंकुशराव

बजाज फायनान्सच्या वसुलीला महर्षी वाल्मिकी संघाचा कडाडुन विरोध;
जोपर्यंत विठ्ठल मंदिर उघडत नाही तोपर्यंत एक रुपयाही भरणार नाही!- गणेश अंकुशराव

पंढरपूर (प्रतिनिधी):- कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या अनेक वर्षांपासुन पंढरीचे श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद आहे. त्यामुळे पंढरीचे अर्थचक्र खिळून बसले आहे. परंतु या कठीण काळात छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी व रिक्षाचालकांनी बजाज फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे. त्यामुळे  रिक्षाचालकांसह गोरगरीब व्यावसायिक भयभीत झाले आहेत. बजाज फायनान्स च्या या दडपशाहीच्या वसुलीला महर्षी वाल्मिकी संघाने कडाडुन विरोध दर्शविला आहे. जोपर्यंत पंढरीतील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर भाविकांसाठी खुले होत नाही तसेच रेल्वेसेवा सुरळीत सुरु होत नाही तोपर्यंत बजाज फायनान्सचा एकही रुपया पंढरीतील कोणताही कर्जदार भरणार नाही! जर बजाज फायनान्सने वसुली मोहिम थांबवली नाही तर आम्ही बजाज फायनान्स च्या कार्यालयाबाहेर मोठे जनआंदोलन उभारु! असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.
 
आज पंढरीतील अनेक रिक्षाचालकांनी बजाज फायनान्स कडून वसुलीसाठी होत असलेल्या त्रासाबद्दल गणेश अंकुशराव यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. यावेळी गणेश अंकुशराव यांनी सर्व रिक्षाचालकांना दिलासा देत, काळजी करु नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे अभिवचन दिले. पंढरीत भरणार्‍या विविध यात्रांवरंच येथील रिक्षाचालक आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचं आर्थिक चक्र अवलंबून असतं  आषाढी, कार्तिकीसारख्या मोठ्या वार्‍या भरल्याच नसल्याने सर्वांनाच मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागत आहे. परंतु बजाज फायनान्सकडून या कठीण काळातही पठाणी वसुली सुरु आहे. ती बजाज फायनान्सने तातडीने थांबवावी अन्यथा आम्ही बजाज फायनान्स च्या विरोधात लोकशाही मार्गाने प्रखर जनआंदोलन उभे करु. असे मतही  यावेळी गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले.

यावेळी संपत सर्जे, निलेश माने, दिनेश अधटराव, प्रदीप परचंडे, प्रसाद परचंडे, सुनील राठोड, सागर परचंडे, सुरज नायकू, संतोष सुरवसे, संतोष वाडेकर, गणेश कोळी, सुरज करकमकर, फैय्याज शेख, ओंकार पांढरे, शिवाजी चव्हाण, अक्षय परचंडे, दत्तात्रय कोळी, राजु गायकवाड, गणेश वाघ, यशवंत म्हेत्रे आदींसह अनेकजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *