ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्ह्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेत अस्वस्थता ?

पालकमंत्र्यांना पत्र देत माढा लोकसभा संपर्क प्रमुखांनी व्यक्त केली नाराजी

२०१९ माढा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविलेले व जवळपास ७४ हजारापेक्षा जास्त मते मिळविलेले माढा तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक अशी ओळख असलेले संजय कोकाटे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना लिहलेल्या पात्रमुळे  जे महाविकास आघाडीच्या काळात घडले तेच भाजपा- बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या युती सरकारमध्ये घडत आहे कि काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
       माढा तालुक्याच्या राजकरणात आमदार शिंदे बंधूचे कट्टर विरोधक अशी संजय कोकाटे यांची प्रतिमा आहे.यातूनच संजय कोकाटे यांनी स्थानिक पातळीवरील प्रत्येक निवडणुकीत सक्रिय सहभाग घेत माढा तालुक्याचे राजकारण एकतर्फी नाही हे दाखवून दिले होते.यातूनच माढा तालुक्यात आ.बबनराव शिंदे यांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर तज्ञ् संचालक म्हणून त्यांची महायुतीच्या सत्ताकाळात नियुक्तीही करण्यात आली होती.आणि या नियुक्तीमुळेच विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने शासकीय भागभांडवल परत करण्याबरोबरच मल्टीस्टेट करण्याचा निर्णय घेतला अशीही चर्चा झाली.
      २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संजय कोकाटे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घेत निवडणूक लढविली.या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे बबनराव शिंदे यांच्या विरोधात संजय कोकाटे यांनी निवडणूक लढविली.या निवडणुकीत संजय कोकाटे यांना माढा तालुक्यातील शिंदे विरोधकांनी उघड आणि छुपे सहकार्यही केले.मात्र २०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आल्याने माढा विधानसभा मतदार संघातील संजय कोकाटे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी,समर्थक यांची मात्र गोची झाली.जिल्हा नियोजन समिती असो अथवा तालुका पातळीवरील विविध समित्या,शिवसैनिकांना विचारात घेतले जात नाही,संजय कोकाटे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुचविलेले कामे प्रशासकीय पातळीवर दुर्लक्षित केले जातात अशा व्यथा मांडली जाऊ लागली,याच विषयावर संजय कोकाटे यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत खदखद व्यक्त केली.अशातच ठाकरे सरकारच्या काळात इंदापूर-बारामती तालुक्यासाठी लाकडी निंबोडी योजनेच्या ३४८ कोटी रुपयांच्या कामास मंजुरी मिळाल्याने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून उद्रेक झाला.मोठी नाराजी व्यक्त झाली.जनआंदोलने झाली.संजय कोकाटेंनी हि बाब उद्धव ठाकरेंच्या लक्षात पत्र लिहून आणून देण्याचा प्रयत्न केला.राष्ट्रवादी कॉग्रेस शिवसेनेवर कशा प्रकारे अन्याय करीत आहे याचा पुन्हा एकदा पाढा वाचला.पण दुर्लक्ष करण्यात आल्याने संजय कोकाटे हे अस्वस्थ होते.
       या साऱ्या घटनाक्रमांतर २१ जून रोजी राज्यात शिवसेनेत बंड झाले,एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस राज्यात सत्तेचा फायदा उठवीत आहे,शिवसेना कमकुवत होत आहे हीच भूमिका मांडत भाजपशी हात मिळवणी केली.आणि इकडे सोलापूर जिल्ह्यात हीच भूमिका उघडपणे मांडत आलेले संजय कोकाटे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.पुढे त्यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या माढा लोकसभा संपर्कप्रमुख पदी निवड झाली.आता माढा तालुक्यातील जनतेची कामे करता येतील अशी अपेक्षाही व्यक्त होऊ लागली.
      मात्र आता राज्यात शिंदे गट-भाजपा युती सत्तेत आल्यानंतर देखील पुन्हा माढा तालुक्यात महाविकास आघाडीच्या सत्ताकाळातील घटनांची पुनरावृत्ती तर होत नाही ना असा प्रश्न उपस्थित होऊ लागला असून सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी नुकतेच आले असता संजय कोकाटे यांनी त्यांना एक पत्र देत आपली खंत व्यक्त केली असून आम्हाला कोणी तरी विचारेल असे वाटले होते,पण कुठलाही बदल झालेला नाही.शासकीय समित्या व विकास कामे निश्चित केली जात असताना यंत्रणेकडून संपर्क केला जात नाही,काही गोष्टीची वाच्यता जाहीरपणे केल्यास त्याचा परिणाम युतीवर होण्याची शक्यता आहे असाही गर्भित इशारा दिला आहे.
    एकूणच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाविकास आघाडीच्या सत्ता काळात जसे राष्ट्रवादी कॉग्रेसचेच वर्चस्व असल्याची भावना होती तशीच भावना आता सोलापूर जिल्ह्याच्या राजकरणात भाजप आपली पकड आणखी मजबूत करीत असताना बाळासाहेबांच्या शिवसेनेत तर नाही ना ? असाही सवाल उपस्थित होत आहे.          
  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *