ताज्याघडामोडी

आता ‘स्पुटनिक’ लसही मोफत मिळणार; रोज 1 कोटी जणांना लस देण्याचे लक्ष्य

 रशियाची स्पुटनिक ही लसदेखील आता सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत उपलब्ध केली जाणार आहे. सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्‍सिन या दोन लसीच लसीकरण केंद्रांवर दिल्या जात आहेत. तसेच, स्पुटनिक ही लस केवळ खासगी लसीकरण केंद्रांवर सशुल्क दिली जात आहे. आता ही लसदेखील आता सरकारी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध केली जाणार असल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या कोविड-19 वर्किंग ग्रुपचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना दिली. सध्या स्पुटनिक व्ही ही लस आयात केली जात असून, लवकरच या लसीचे उत्पादन भारतात केले जाणार आहे. या लसीच्या पुरवठ्यानुसार सरकारी लसीकरण केंद्रांवर ही लस लवकरच मोफत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे डॉ. अरोरा यांनी सांगितले.भारतात सध्या दररोज सरासरी सुमारे 50 लाख जणांचे लसीकरण करण्यात येत आहे. ऑक्‍सफर्ड-ऍस्ट्राजेनेकाने विकसित केलेली आणि भारतात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये निर्मिती केली जाणारी कोव्हिशिल्ड आणि हैदराबादच्या भारत बायोटेकने विकसित केलेली पूर्णतः स्वदेशी कोव्हॅक्‍सिन या दोन लसींचा सध्याच्या लसीकरण मोहिमेत मोठा वाटा आहे. या लसींचे उत्पादन वाढवण्याचे नियोजन आहे.

तसेच, आता स्पुटनिक ही लसदेखील सरकारी लसीकरण कार्यक्रमात उपलब्ध केली जाणार आहे. त्याशिवाय मॉडर्ना आणि झायडस कॅडिला या दोन कंपन्यांच्या लसींनाही लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा असल्यामुळे आगामी काही आठवड्यांत रोजच्या लसीकरणाची संख्या 80 लाख ते एक कोटीपर्यंत जाऊ शकते, असे डॉ. अरोरा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *