प्रसिध्द औषध कंपनी झायडस कॅडीलाने त्यांची झायकोव डी ही लस लॉंच करण्याच्या संदर्भात आपत्कालीन उपयोग प्राधिकरण अर्थात इयुएकडे परवानगी मागितली आहे. कंपनीने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डिजिजिआयकडेही याबाबत अगोदरच अर्ज केला आहे. 12 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांसाठी ही लस असून त्याची तिसरी चाचणीही पूर्ण झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.झायकोव डी ही डिएनए आधारित जगातील पहिली करोना विरोधी लस आहे. लक्षणे असलेल्या अर्थात सिम्प्टोमॅटीक कोविड ही लस 66.6 टक्के प्रभावी असून त्याच्या पुढील आजारावर ती शंभर टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी ही लस अत्यंत उपयुक्त असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
देशभरातील 28 हजार स्वयंसेवकांवर लसीची चाचणी घेण्यात आली असून त्याचे रिझल्ट अत्यंत प्रभावी आणि उत्साहवर्धक असल्याचे सांगण्यात आले. या 28 हजार जणांपैकी एक हजार जण हे 12 ते 18 वयोगटातील होते व लसीचे तिन डोस घ्यावे लागणार असून त्याकरता सूईचा वापर करण्याची आवश्यकता नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.