गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मद्यधुंद पोलिसाचा कोविड सेंटरमध्ये हंगामा, कर्मचारीही झाले हतबल

मद्यधुंद अवस्थेतील एक पोलीस कोरोना झालेल्या एका आरोपीला घेऊन कोविड सेंटरमध्ये घुसला आणि त्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. ऑन ड्युटी पोलिसाची ही अवस्था बघून आपण आता नेमकं काय करावं, हे कोविड सेंटरवरील कर्मचाऱ्यांनाही समजेना. त्यात पोलिसाने असा उग्र अवतार धारण केला की काही विचारता सोय नाही. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार, या म्हणीसारखी झाली.बुलडाण्यातील अपंग निवासी विद्यालय कोविड सेंटरमध्ये एक पोलीस कर्मचारी एका आरोपीला घेऊन आला.

या आरोपीला कोरोना झाल्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला आपण घेऊन आल्याचं या पोलीस कर्मचाऱ्यानं सांगितलं. त्यावर कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी नेहमीची प्रक्रिया सुरू केली. मात्र या पोलीस कर्मचाऱ्याने मद्यप्राशन केले होते आणि त्याची चांगलीच धुंदी त्याला चढली होती. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये या पोलीसाचा एक नाट्यप्रयोगच सुरू झाला.कोविड सेंटरमधील महिला कर्मचाऱ्यांनी या पोलिसाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र महाशय काही ऐकण्याच्या अवस्थेत नव्हते. कर्मचारी जेवढा समजुतीचा स्वर लावायचे, तितकेच हे पोलीस महाशय दमदाटीचा आवाज वाढवायचे. हा प्रकार बराच वेळ सुरू होता. या पोलिस महोदयांसोबत उपचार घेण्यासाठी आलेला आरोपीदेखील हा प्रकार बघून चकीत झाला.

पोलीस गोंधळ घालत आहे आणि आरोपी शांतपणे हा प्रकार पाहत आहे, असं चित्र काही काळ कोविड सेंटरमध्ये निर्माण झालं होतं. थोड्या वेळाने धुंदी उतरल्यानंतर पोलीस महाशय शांत झाले आणि कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. तिथं उपस्थित काहीजणांनी हा प्रकार त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि समाजमाध्यमांवर अपलोड केला. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *