गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तोतया पोलीस उपनिरीक्षकाने घातला ५१ लाखांना गंडा; ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : मुंबई पोलीस दलात अधिकारी असल्याची बतावणी करत एका महिलेच्या साथीने कस्टममध्ये नोकरी लावतो, असे सांगून तिघांना ५१ लाख १७ हजार ४०० रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट नियुक्ती पत्र देऊन अजून पैसे हडपण्याचा त्याचा डाव लक्षात आल्याने सापडू शकला.

राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४३, रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्या तोतयाचे नाव आहे. त्याची साथीदार सुलोचना दादू सोनवणे (वय ३७, रा. टिंगरेनगर) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिंदे याच्या घरातून ५ ते ६ पोलिसांचे गणवेश व दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.हा प्रकार २०१७ पासून आतापर्यंत सुरु होता. याप्रकरणी दीपक मोहनलाल मुंदडा (वय ५१, रा. शनिवार पेठ) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

मुंदडा यांचा गणेश मूर्ती विक्रीचा व्यवसाय आहे. तोतया शिंदे हा त्यांच्याकडे २०१४ मध्ये मूर्ती खरेदी करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने आपण मुंबई पोलीस दलात अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्यातून पुढे त्यांच्यात ओळख झाली. दरम्यान, शिंदे याने मुंदडा यांना आपली कस्टम ऑफिसमधील अधिकारी ओळखीचे आहेत. तेथे मी तुमच्या मुलांना नोकरी लावून देतो, असे सांगितले. तो पोलीस असल्याचे सांगत असल्यामुळे त्यांचा विश्वास बसला. तो जेव्हा जेव्हा मुंदडा यांना भेटला. तेव्हा त्याच्या गाडीत पोलिसांचा गणवेश होता. त्याच्याबरोबर असलेली सुलोचना सोनावणे ही कस्टम विभागात अधिकारी असल्याचे शिंदे सांगत असे. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने ज्या मुलांना नोकरी लावणार आहे, त्यांना साहित्य पाठवून दिले होते. तसेच त्यांना मुंबईला नेऊन एका रुग्णालयात मेडिकलही करुन घेतली होती.

तरुणांकडून क्लार्कपदासाठी प्रत्येकी १५ लाख तर, सुपरिडेंट पदासाठी २५ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून वेळोवेळी ५१ लाख १७ हजार रुपये घेतले होते. पैसे घेतल्यावर वेगवेगळी कारणे सांगून त्याने टाळाटाळ केली होती. फिर्यादीचा मित्र चंद्रकांत चव्हाण यांच्याकडूनही मुलाला नोकरी लावतो, असे सांगून पैसे घेतले.

गणवेशामुळेच फसला

शिंदे याने आपल्याला फसविले असे मुंदडा यांना संशय येत होता. त्याचवेळी गेल्या आठवड्यात शिंदे याने मुंदडा यांना फोन करुन तुमच्या मुलाची नियुक्ती पत्रे आली आहे. राहिलेले पैसे घेऊन या. नियुकतीपत्र घेऊन जा, असे सांगितले. त्याने मुंदडा यांना संगम पुलाजवळ बोलावले होते. मात्र, मुंदडा यांनी त्याला कसबा पेठ क्षेत्रिय कार्यालयाजवळ बोलावून घेतले. मुंदडा यांनी आपल्या पुतण्या पोलीस मित्र याला बरोबर घेतले होते. तो कसबा पेठेत आल्यानंतर या पोलीस मित्र पुतण्याच्या नजरेतून तो सुटला नाही. त्याचा गणवेश पोलीस उपनिरीक्षकाचा होता पण नेमप्लेट त्याने सहायक निरीक्षकाची लावली होती.

पुतण्याने त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केल्यावर तो गडबडून गेला. मुंदडा यांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलीस येत असल्याचे दिसल्यावर शिंदे पळून जाऊ लागला. तेव्हा त्याला नागरिकांच्या मदतीने पकडून पोलिसांच्या हवाली केले. फरासखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *