ताज्याघडामोडी

रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर, मोफत धान्यासह इतरही अनेक फायदे

भारतात रेशन कार्ड हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो. प्रत्येक भारतीयाला त्याच्या आर्थिक स्थितीनुसार रेशन कार्डसाठी अर्ज करता येतो आणि आर्थिक स्तरानुसार मिळणाऱ्या रेशन कार्डवरून सरकारी योजनांचा लाभ घेणं शक्य होतं. सरकारनं सध्या गरीबांना 4 महिने मोफत धान्य मिळेल, अशी घोषणा केल्यामुळे रेशन कार्डच्या आधारे ते धान्य मिळवणं शक्य होणार आहे. त्याशिवाय रेशन कार्डचे इतरही अनेक फायदे नागरिकांना घेता येणार आहेत.

गरीबांसाठी धान्य

कोरोना आणि लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला तो देशातील गरीब, कष्टकरी आणि कामगार वर्गाला.या वर्गासाठी सरकारनं सुरु केलेल्या मोफत धान्य योजनेला आणखी 4 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येक गरीबाला धान्य मिळावं आणि कुणीही उपाशी राहू नये, या हेतूने सुरु केलेल्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे. रेशन कार्ड दाखवून दरमहा 5 किलो धान्य नागरिकांना मिळू शकतं.

धान्याशिवाय अन्य फायदे

रेशन कार्डचा उपयोग केवळ धान्य मिळवण्यासाठीच होत नाही. तर एक ओळखपत्र म्हणूनही रेशन कार्ड उपयुक्त आहे. मतदार ओळखपत्र काढायचे असेल, तर रेशन कार्डचा उपयोग होऊ शकतो. गॅस सिलिंडर घ्यायचा असेल तरी रेशन कार्डची आवश्यकता असते. बँकेशी संबंधित काही काम असेल, तरीही त्यातील बहुतांश कामांसाठी रेशन कार्डचा उपयोग होऊ शकतो. ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून याचा उपयोग होऊ शकतो.

आर्थिक स्तरानुसार रेशन कार्ड

तुम्ही दारिद्र्य रेषेच्या खाली असाल, म्हणजेच तुमचं वार्षिक उत्पन्न 27 हजारांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही बीपीएल रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता. त्यापेक्षा जास्त असेल तर एपीएलसाठी अर्ज करता येतो. राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रेशन कार्डसाठी अर्ज करता येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *