ताज्याघडामोडी

पैज लावून सांगतो, करोनाची तिसरी लाट येणारच नाही; भारताच्या ‘वॉरेन बफेट’चा दावा

नवी दिल्ली – देशात करोना संसर्गाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र अद्याप दुसरी लाट संपलेली नाही. त्यातच करोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा अंदाजही वर्तविला आहे. सरकारी यंत्रणाही तिसऱ्या लाटेसाठी सज्ज झाली आहेत. मात्र भारतातील वॉरेन बफेट म्हणून प्रसिद्ध असलेले उद्योगपती राकेश झुनझुनवाला यांनी तिसऱ्या लाटेसंदर्भात मोठा दावा केला आहे.

भारतात करोना संसर्गाची तिसरी लाट येणार नाही, असा दावा झुनझुनवाला यांनी केला आहे. पैंज लावून आपण हा दावा करण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटलं. त्यामुळे तिसरी लाट येईल म्हणून मार्केटमधील गुतंवणूकदारांनी काळजी करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

याआधी कोणीही करोना संसर्गाच्या दोन लाटा येतील, अशी भविष्यवाणी नव्हती केली. मात्र आता प्रत्येकजण करोनाची तिसरी लाट येणार अशी शक्यता व्यक्त करत आहे. मात्र ज्या गतीने लसीकरण सुरू आहे आणि आपण ज्या पद्धतीने प्रतिकारशक्ती वाढवत आहोत, त्यावरून करोनाची तिसरी लाट येण्याची सुताराम शुक्यता नाही, असं झुनझुनवाला यांनी नमूद केलं. देशात आतापर्यंत करोना लसीचे २८ कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत.

दरम्यान तिसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम होणार नाही. उलट काही सुधारणा होऊ शकतात. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असं झुनझुनवाला यांनी नमूद केलं. तसेच तिसरी लाट येवो अथवा न येवो, भारतीय अर्थव्यवस्था कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असल्याचे सांगत करोनाची तिसरी लाट येणार नाहीच, याचा झुनझुनवाला यांनी पुनरोच्चार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *