ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदाराला 10 वर्षांची शिक्षा; हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात दोषी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अडचणीत सध्या भर पडत आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला असताना दुसरीकडे पक्षाच्या खासदाराविरोधात गुन्हा सिद्ध झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैझल  यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे.

लक्षद्वीपच्या एका न्यायालयाने बुधवारी लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांच्यासह चार जणांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. कावरत्ती येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 2009 मध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोषींना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती प्रकरणाशी संबंधित वकिलांनी दिली.

वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार आणि इतर आरोपींनी 2009 मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान एका राजकीय मुद्यावरून माजी केंद्रीय मंत्री पी.एम. सईद यांचे जावई पदनाथ सालीह यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर खासदार फैजल आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता कोर्टाने निकाल सुनावला आहे.

कोर्टाने दिलेल्या निकालाला खासदार फैजल उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना खासदार मोहम्मद फैजल यांनी ही बाब राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. या आदेशाला लवकरच उच्च न्यायालयात अपील करून आव्हान देणार असल्याचे खासदार मोहम्मद फैजल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *