गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गाव गुंडाची काढली धिंड; वाहनांची तोडफोड केल्यानं पोलिसांची कारवाई

पुणे, 15 जून: काही दिवसांपूर्वी पुण्यातील वाकड परिसरात काही तरुणांनी बऱ्याच चारचाकी वाहनांची तोडफोड केली होती. रात्रीत झालेल्या या संताजपजनक प्रकारानंतर परिसरात दहशतीचं वातावरण तयार झालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. तसेच या गुंडाच्या टोळक्याची परिसरातील दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे.

संबंधित गाव गुंडांनी दोन ते तीन दिवसांपूर्वी वाकड परिसरातील महतोबा नगर झोपडपट्टीसमोर 15 मालवाहक ऑटो रिक्षांची तोडफोड केली होती. यानंतर परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती.त्यामुळे पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांची धिंड काढली आहे. आरोपींना अटक केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त करत सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

खरंतर यापूर्वीही पिंपरी चिंचवड परिसरात अनेकदा वर्चस्वाच्या वादातून अनेकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. एखाद्या परिसरात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी काही भरकटलेले तरुण अशा प्रकारचे कृत्य करत असल्याचं समोर आलं आहे. वेळोवेळी पोलिसांनी कारवाई करत आरोपींना चाप बसवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आरोपींची खोड मोडत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे अशाप्रकराची धिंड काढून त्यांची दहशत संपवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.

याशिवाय अलीकडेच पिंपरी चिंचवडमध्ये एका सुरक्षा रक्षकाने सोसायटीसमोर पार्क केलेल्या 12 ते 14 वाहनांची तोडफोड केली होती. वारंवार सांगूनही भाजीविक्रेते आपली वाहनं या सोसायटीसमोर पार्क करत होती. त्याचबरोबर याठिकाणी कचरा टाकून लघवीलाही जात होते. त्यामुळे चिडलेल्या सुरक्षा रक्षकाने दारुच्या नशेत ही तोडफोड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे. पण अशा तोडफोडीच्या घटना वारंवार घडत असल्यानं नागरिकांना दहशतीत जगावं लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *