गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धुळे-सोलापूर हायवेवर ट्रकचा अपघात; स्थानिकांकडून गाडीतल्या 75 लाखांच्या मालाची लूट

उस्मानाबाद : बंगळुरूहून दिल्लीकडे जाणारा कंटेनर रिमझिम पावसाच्या सरींमुळे धुळे-सोलापूर हायवेवर असलेल्या तेरखेडा गावानजिक पहाटे तीन वाजता पलटी झाला. ड्रायव्हरने पुढची काच फोडून बाहेर येऊन आपला जीव कसाबसा वाचवला. परंतु अंधाराचा फायदा घेत स्थानिक रहिवाशांनी गाडीतला जवळपास 75 लाखांचा माल लुटून नेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सदरची घटना घडली आहे. या प्रकारानंतर लोकांनी पळवलेला माल ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर केला. तरीही पोलिसांना गायब झालेला सगळा माल ताब्यात घेण्यात यश मिळाले नाही. सुमारे 40 लाखांचा माल अद्याप गायब आहे.

बंगळुरूहून ई कॉमर्स कंपनीचा माल घेऊन एक कंटेनर निघाला होता. त्यात लॅपटॉप, मोबाईल हॅंडसेट, बॅटरीज, हेडफोन, कपडे असा 75 लाखांचा माल होता. सोमवारी पहाटे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा जवळ हा टेम्पो पलटी झाला. रिमझिम पाऊस असल्याने गाडी घसरल्याचे ड्राईव्हर सांगतो आहे. गाडी पलटी झाल्यावर गाडीतील सगळं सामान रस्त्यावर पडलं. ही माहिती शेजारील वस्तीवर राहणाऱ्या ग्रामस्थांपर्यत पोहोचली. त्यांनी उलटलेल्या कंटेनरजवळ येऊन सुमारे 75 लाखांचा माल पळवून नेला.

लोकांनी कंटेनरचे कुलूप तोडून आतमधील मालाची लूट केली. या घटनेची माहिती येरमाळा पोलीस स्टेशनला मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परंतु वेळ निघून गेली होती. या कंटेनर मधील एका ऑनलाईन शॉपिंग कंपनीचा माल होता. त्यात लॅपटॉप, कपडे, मोबाईल हेडफोन, बॅटरी, कॉम्प्युटर इतर वस्तू होत्या त्या स्थानिक लोकांनी लुटून नेल्या होत्या.

पोलिसांनी कुठे काय पडले आहे का याचा शोध घेण्यासाठी ड्रोनचाही वापर केला. आत्तापर्यंत दोन महिला आणि दोन पुरुष यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे सापडलेल्या मालाचा पंचनामा सुरू केला. परंतु सगळा माल मिळून आलेला नाही. आरोपींकडून मिळालेल्या मालाची किंमत किती होते हे अजून तरी पोलिसांनी सांगितलेले नाही. उलटलेला कंटेनर येरमाळा पोलीस स्टेशनला आणून ड्रायव्हर आणि क्लीनर यांची चौकशी सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *