ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीच्या आमदारावर गंभीर आरोप; नीलम गोऱ्हे यांनी केली ‘ही’ मागणी

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना होत असलेल्या त्रासाची वरिष्ठ महिला सचिवामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी स्वत: देवरे यांच्याशी संपर्क साधून त्यांची तक्रार समजून घेतली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांकडूनही माहिती घेतली आणि मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून ही मागणी केली आहे.

तहसीलदार ज्योती देवरे यांची आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये त्यांनी नाव न घेता पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्यावर आरोप केले आहेत. याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांची या प्रकरणात साथ मिळत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ही क्लिप समोर आल्यानंतर आमदार लंके यांनी आरोप फेटाळले. देवरे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे समोर आले असून त्याचा चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईसाठी पाठविल्याने त्यातून बचावासाठी देवरे यांचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचे लंके यांनी म्हटले होते.

दरम्यानच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी देवरे यांच्याविरुद्ध पूर्वीच पाठविलेला कसुरी अहवालही व्हायरल झाला.शनिवारी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ महिला सचिवांमार्फत करण्याची मागणी केली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी शुक्रवारीच देवरे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी संपर्क साधून विभागीय स्तरावर जी चौकशी सुरू आहे, त्यात लक्ष घालण्यास सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनाही गोऱ्हे यांनी संपर्क केला. त्यांनी महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू असून ती सात दिवसांत पूर्ण होणार असल्याचे सांगितले.

यावर बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘लोकप्रतिनिधींची कामे होत असताना काही वेळा मतभेद होतात आणि काही वेळेला विशेष हक्कांचा प्रश्न देखील तयार होतो. दुसऱ्या बाजूला प्रशासनातील काही लोक महिला अधिकाऱ्यांवर किंवा इतरांवर सुद्धा कुरघोडी करण्यासाठी अयोग्य गोष्टींचा वापर करताना दिसतात. या सगळ्याबद्दलची चौकशी झाल्यावर त्यामध्ये जी वस्तुस्थिती आहे ती समोर येईल. या दृष्टीकोनातून या चौकशीमधील तपशीलाची अपेक्षा असेल, असे डॉ.गोऱ्हे म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *